

ठाणे : मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३० मधील नगरसेविका सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात आता एमआयएमकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. विरोधक आणि तक्रारदारांकडून या मुद्द्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप एमआयएमचे गटनेते सेफ पठाण यांनी केला.
पत्रकारांशी संवाद साधताना पठाण यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाकडे सादर केलेली सर्व कागदपत्रे अधिकृत असून त्यामध्ये कोणतीही बनावट माहिती नाही. सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात वकिलांशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत सविस्तर भूमिका मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील सुनावणीत काही शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आल्याचीही चर्चा असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पठाण पुढे म्हणाले की, सहर शेख आणि त्यांचे वडील लवकरच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. काही वैयक्तिक कारणांमुळे ते अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आले नसून सध्या ते मुंबईत नातेवाईकांकडे असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात आवश्यक असल्यास जिल्हा सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याची तयारी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सहर शेख ‘नॉट रिचेबल’
मुंब्रा परिसरातील नगरसेविका सहर शेख या सध्या संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आणि त्यांचे वडील युनूस शेख हे मुंब्रा परिसरात दिसले नसून माध्यम प्रतिनिधींशी संपर्क टाळत असल्याचे सांगितले जात आहे.