

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने काँग्रेसने दिलेला स्वबळाचा नारा अखेर पक्षालाच अंगलट आला आहे. ठाणे काँग्रेसने पालिका निवडणुकीत तब्बल ६० उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांमध्ये स्वतः काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्षही निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांनाही स्वतःची जागा जिंकण्यात अपयश आल्याने काँग्रेसला यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. परिणामी, काँग्रेसला ‘भोपळा’ही फोडता आला नसल्याचे चित्र समोर आले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी युतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात झाला होता. जागावाटपात काँग्रेसने ३५ ते ४० जागांची मागणी केली होती. मात्र, आघाडीतील इतर घटक पक्ष केवळ ५ ते ६ जागा देण्यावर ठाम होते. ठाणे महापालिकेतील ३३ प्रभागांतील १३१ जागांपैकी ६० जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे करत महायुतीसह महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे, ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण स्वतःही निवडणूक रिंगणात उतरले होते. गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत ठाण्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नसल्याचे स्पष्ट झाले. खुद्द जिल्हाध्यक्षांनाही पराभवाला सामोरे जावे लागल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक मोठा धक्का मानली जात आहे.