डोंबिवली : स्व. राजेंद्र देवळेकर यांनी महापौर असताना दूरदृष्टी दाखववत कल्याण मधील पालिकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र धरणाची गरज असल्याचे सांगितले होते. यानंतर आता वाढत्या लोकसंख्येकरिता स्वतंत्र धरणासाठी एस.सी.एच.आय.कडून मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक विचार करून होणार दिला आहे. लवकरच कल्याण -डोंबिवलीकरांसाठी स्वतंत्र धरण होईल, अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी ‘दै. नवशक्ति’शी बोलताना दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेने येथील पाणी समस्या सुटली नाही.१ जून २०१५ रोजी पालिकेत २७ गावे समाविष्ट झाली असून, येथील पाणी टंचाई जाणवते.एकीकडे एमआयडीसीची थककेली कोटीच्या वरील रक्कम तर दुसरीकडे टॅकरमाफियांची चांदी यात २७ गावाची जनता त्रस्त झाली.
याबाबत शिवसेना (शिंदे गट) कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील म्हणाले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी स्वतंत्र धरणाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याकरता होणार दिला असून, लवकरच आपली मागणी पूर्ण होईल आणि कल्याण-डोंबिवलीकरांची पाण्यासाठी वणवण थांबले. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अमृत योजनेअंतर्गत मोहिली येथील २७५ द.ल.लि. क्षमतेच्या उदंचन केंद्राचा ऑनलाईन भूमिपूजन समारोह संपन्न झाला होता.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील पाणीपुरवठा प्रकल्पाची, मोहिली येथे २७५ द.ल.लि. क्षमतेचे उदंचन केंद्र बांधणे, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नवीन १० जलकुंभ बांधणे, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नव्याने विकसित भागात वितरणव्यवस्था टाकणे, गौरीपाडा येथे ९५ द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे ही कामे मंजूर आहेत. या कामांमुळे महानगरपालिका क्षेत्रातील सद्यस्थितीतील विकसीत होत असलेल्या भागाला सुरळीत व शुध्द पाणीपुरवठा होणार आहे. मोहने उदंचन केंद्र हे सुमारे ४० ते ४५ वर्षे जुने असून, या नविन उदंचन केंद्रामुळे, मोहने उदंचन केंद्राच्या देखभाल दुरुस्ती व जलशुध्दीकरण केंद्रातील शुध्दीकरणावर होत असलेल्या खर्चात वार्षिक रुपये ०.७५ ते १ कोटी इतकी बचत होणार आहे.