शहाड उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद! दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

प्रतीक्षेनंतर अखेर दीर्घ कल्याण-मुरबाड महामार्गावरील शहाड उड्डाणपुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामाला सोमवारच्या मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. या कामादरम्यान पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, ३ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही प्रकारची वाहतूक या मार्गावरून होणार नसल्याची माहिती उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली.
शहाड उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद! दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
शहाड उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद! दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
Published on

उल्हासनगर : प्रतीक्षेनंतर अखेर दीर्घ कल्याण-मुरबाड महामार्गावरील शहाड उड्डाणपुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामाला सोमवारच्या मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. या कामादरम्यान पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, ३ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही प्रकारची वाहतूक या मार्गावरून होणार नसल्याची माहिती उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली.

ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या अधिसूचनेनुसार मध्यरात्री १२ वाजता वाहतूक बंदीची अंमलबजावणी करण्यात आली. काही मिनिटांतच यंत्रसामग्री, कामगार आणि अभियंते युद्धपातळीवर कार्यरत झाले. या दुरुस्तीच्या कामासाठी आमदार कुमार आयलानी यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि मे. संरचना कंपनी यांनी संयुक्त विद्यमाने उपक्रम हाती घेतला आहे. पुलावरील जुना डांबर थर काढून नवीन टिकाऊ थर बसविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर पुलाचे रेलिंग, लाइटिंग आणि इतर आवश्यक दुरुस्तीही करण्यात येणार आहे.

विभागाच्या काम २४ तासांच्या शिफ्टमध्ये सुरू असून रात्रीच्या वेळीही रोलर, कटिंग मशीन आणि क्रेनची अविरत हालचाल दिसत आहे. वाहतूक अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांना शहाड पुलावरून प्रवास बंदी लागू असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुलाजवळील चौकांवर दिशा फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि सूचना फलक बसवण्यात आले आहेत. वाहतूक विभाग आणि पोलिसांकडून विशेष मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल.

शहाड उड्डाणपुलावरील वाहतूक बंदी ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पुलाच्या दुरुस्तीच्या दृष्टीने आवश्यक आहे. काम युद्धपातळीवर सुरू असून सर्व मार्गावर आमचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे. आमचे उद्दिष्ट वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना शक्य तितकी कमी गैरसोय होऊ देणे हेच आहे. शहाड पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

राजेश शिरसाट (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उल्हासनगर वाहतूक विभाग)

संयम बाळगण्याचे आवाहन

या बंदीमुळे उल्हासनगर, कल्याण आणि मुरबाडदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना काही दिवस गैरसोय होणार असली, तरी प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शहाड उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in