

उल्हासनगर : मनसेच्या कडक इशाऱ्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर शहाड स्थानकावरील चुकीचा ‘शहद’ असा लिहिलेला फलक बदलून योग्य ‘शहाड’ असे नाव लावले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या लक्षात गेल्या आठवड्यात अंबरनाथ दौऱ्यावर असताना ही चूक आली होती. त्यांनी संताप व्यक्त करून कार्यकर्त्यांना रेल्वे प्रशासनाला तातडीने निवेदन द्यायला सांगितले होते.
मनसे पदाधिकाऱ्यांनी रेल्वेला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत इशारा दिला होता की, दुरुस्ती न झाल्यास आंदोलनात्मक पावले उचलली जातील. रेल्वे प्रशासनाने ही चूक मान्य करत त्वरीत कारवाई केली आणि आता शहाड स्थानकावरील सर्व बोर्डांवर योग्य नाव लावण्यात आले आहे.
ही जलद दुरुस्ती रेल्वे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे उदाहरण ठरली असून, मनसेच्या कठोर भूमिकेमुळे स्थानिक भाषेच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.
तरच संस्कृतीची खरी ओळख टिकेल
या निर्णयाचे मनसेने स्वागत केले असून, 'महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर स्थानिक भाषेला प्राधान्य द्यावे,' अशी मागणी पुन्हा पुढे आली आहे. स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त करताना म्हटले, 'फक्त शहाडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानकांवर स्थानिक भाषेला सन्मान मिळाल्यास आपल्या संस्कृतीची खरी ओळख टिकून राहील.'