

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
मेघराज वेखंडे (१९) आणि मदन वरकुटे (४४) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही वासिंद येथून दुचाकीवरून मुंबई-नाशिक महामार्गाने शहापूरच्या दिशेने येत होते. आसनगाव हद्दीत आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, याप्रकरणी शहापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.