
शहापूर : पोटच्या तीन सख्खा मुलींचा जेवणातून विष देऊन जीव घेणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. ही घटना शहापूर तालुक्यातील किन्हवली विभागातील अस्नोली गावातील तलेपाडा येथे घडली. काव्या संदीप भेरे (१०), दिव्या संदीप भेरे (८) व गार्गी संदीप भेरे (५), अशी मृत मुलींची नावे आहेत.
शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या संदीप भेरे असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ती आपल्या ३ मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून माहेरी राहत होती. २१ जुलै रोजी सोमवारी काव्या , दिव्या आणि गार्गी यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने खासगी डॉक्टरांकडे त्यांना नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघींवर काळाने झडप घातली.
शवविच्छेदनातून विषप्रयोग झाल्याचे उघड
नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या काव्या आणि गार्गीचा मृत्यू गुरुवारी २४ जुलै रोजी झाला, तर दिव्याचा मृत्यू शुक्रवारी २५ जुलै रोजी झाला.नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालाकरिता पाठविण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालातून तिन्ही मुलींना जेवणातून कीटकनाशक दिल्याचे उघड झाले असल्याची माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली.