शहापूर : रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहापूरजवळ असलेल्या सापगाव येथील भातसा नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
सापगाव पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले असले, तरी सद्यस्थितीत या मार्गावरून केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पुलाच्या दोन्ही बाजूकडील कठडे तुटले आहेत. रुंदीने आधीच कमी असलेल्या या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी मज्जाव करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे तसेच पुलाची दयनीय अवस्था झाल्यामुळे आगारातून एकही बस सापगाव पुलावरून सोडली जात नसल्याची माहिती आगार प्रमुख मानसी शेळके यांनी दिली होती. मात्र, आजपासून बसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
नवीन पुलाची मागणी
भातसा नदीवरील हा पूल फार जुना आणि कमकुवत झाला आहे. अनेक वर्षांपासून नवीन पूल बांधण्याची मागणी होत असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, आता तातडीने नवीन पूल बांधण्याची नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या अत्यावश्यक मागणीकडे प्रशासन आणि राजकीय पुढारी गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.