
ठाणे : बांधकाम व्यावसायिकाकडून ३५ लाखांची लाच स्वीकारणारे ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह तिघांचाही जामीन अर्ज ठाण्याचे सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी फेटाळला. या गंभीर प्रकरणाचा अद्यापही तपास सुरू असल्याने पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी हा जामीन फेटाळण्यात आल्याचेही न्यायालयाने म्हटले.
गुरुवारी याच संदर्भात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)च्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली होती. तपासातील काही त्रुटींवरही बोट ठेवले होते. तसेच निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास दिल्यानेही न्यायालयाने खेद व्यक्त केला. त्यामुळे निरीक्षकांऐवजी अधीक्षकांनीच या सुनावणीला हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी एसीबीचे ठाण्याचे अधीक्षक शिवराज पाटील हे स्वत: उपस्थित होते. या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. आरोपीचा फोनही जप्त केला आहे. चौकशीही झाली आहे. त्यामुळे पाटोळे यांच्यासह तिघांनाही जामीन दिला जावा, अशी मागणी पाटोळे यांचे वकील विशाल भानुशाली, ओमकार गायकरचे वकील जयेश तिखे आणि सुशांत सुर्वेचे वकील समीर हटले यांनी केली. दरम्यान एका उच्च पदस्थ अधिकारी म्हणाले की, अशा प्रकारे लाच घेणे हे समाजाला घातक आहे. आरोपीला जामीन दिल्याने तपासात बाधा येऊ शकते. तपास प्राथमिक पातळीवर असल्याची बाजू सरकारी वकील संजय लोंढे यांनी मांडली. दोन्ही बाजू पडताळल्यानंतर पाटोळे यांच्यासह तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले. या सुनावणीच्या वेळी न्यायालयात अनेक वकीलांनी गर्दी केली होती.