Thane : तीन गाळ्यांचे प्रकरण उपायुक्त पाटोळेंना भोवले; २५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक, दोन दिवसांची ACB कोठडी

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाख रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. खासगी जागेवरील अतिक्रमण (तीन गाळे) काढण्यासाठी ही लाच मागितली गेली होती.
Thane : तीन गाळ्यांचे प्रकरण उपायुक्त पाटोळेंना भोवले; २५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक, दोन दिवसांची ACB कोठडी
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाख रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. खासगी जागेवरील अतिक्रमण (तीन गाळे) काढण्यासाठी ही लाच मागितली गेली होती. या कारवाईमुळे ठाण्यातील बांधकामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ठाणे न्यायालयाने गुरुवारी पाटोळे यांना दोन दिवसांची एसीबी कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने ठाण्यातील विष्णुनगर (घंटाळी) परिसरातील जागा विकसित करण्यासाठी घेतली होती. या जागेत तीन अनधिकृत दुकाने (गाळे) उभारलेली होती. जागा मालकाने वारंवार तक्रार करूनही कारवाई झाली नाही. अखेर ८७ वर्षीय जागा मालकाने सर्व अधिकारपत्र व्यावसायिकाला दिले. या अनधिकृत गाळ्यांवर कारवाईसाठी व्यावसायिकाने पाटोळे यांची भेट घेतली. पाटोळे यांनी कारवाईसाठी सुरुवातीला २० लाखांची मागणी केली होती, जी नंतर वाढून ५० लाख झाली.

पाटोळे आणि त्यांचे सहकारी संतोष तोडकर यांच्या सांगण्यावरून व्यावसायिकाने १० लाख रुपये सुशांत सुर्वे यांच्या बँक खात्यात जमा केले. १० लाख मिळाल्यावर पाटोळे यांनी ३१ जुलै आणि १९ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित बांधकामांना दोन नोटीस बजावल्या; मात्र प्रत्यक्षात गाळे हटवण्याची कोणतीच कारवाई झाली नाही. १० लाख देऊनही कारवाई न झाल्याने विकासक हैराण झाला होता. पालिकेतील सूत्रांनुसार, एका प्रभावशाली नेत्याच्या जवळ असलेल्या याच विकासकाला पाटोळे यांनी आपल्या केबिनबाहेर पाच तासांहून अधिक वेळ ताटकळत ठेवले होते.

पुढील भेटीत पाटोळे यांनी पुन्हा ५० लाखांचा आकडा कागदावर लिहून देत आणखी पैशांची मागणी केली. मात्र अखेर व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार केली. या प्रकरणी एसीबीने सापळा रचला. ठाणे महापालिकेचा वर्धापनदिन असल्याने मुख्यालयातील कर्मचारी व अधिकारी एका कार्यक्रमात व्यस्त असताना पाटोळे यांनी विकासकाला पैसे घेऊन येण्यास सांगितले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास विकासक २५ लाखांचा पहिला हप्ता घेऊन आला. पाटोळे यांनी रक्कम थेट आपल्या गाडीत ठेवण्यास सांगितले. पाटोळे यांच्या व्यक्तीने गाडीत जाऊन रक्कम घेतली आणि पाटोळे यांनी ‘ओके- डन’ म्हणताच एसीबीच्या पथकाने त्यांना महापालिका मुख्यालयातील त्यांच्याच केबिनमध्ये रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुनर्वसनाचा मुद्दा

घंटाळी भागातील हे तीन गाळे मागील अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी आहेत. मागील काही वर्षांपूर्वी रस्तारुंदीकरणामुळे त्यांची अर्धी जागा गेली होती. महापालिकेने त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप झालेले नाही. "आधी पुनर्वसन करा, मगच जागा खाली करतो," अशी मागणी गाळेधारकांनी केली असल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात बांधकामाच्या वादासोबतच पुनर्वसनाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला आहे.

logo
marathi.freepressjournal.in