जागावाटपावरून शिेंदे सेनेत संघर्ष; ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरीची तयारी

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची रस्सीखेच अद्यापही कायम आहे. त्यातच अनेक शिंदे सेनेतील माजी नगरसेवक आपले मुलांना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याच्या तयारीत असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. हा असंतोष आता केवळ चर्चेपुरता न राहता उघडपणे व्यक्त होऊ लागल्याने ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचे संकेत आहेत.
जागावाटपावरून शिेंदे सेनेत संघर्ष; ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरीची तयारी
छायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

विशाल ब्राम्हणे/ठाणे

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची रस्सीखेच अद्यापही कायम आहे. महायुतीत निवडणूक लढवण्यावर एकमत झाले असले, तरी कोणत्या प्रभागात कोणाचा उमेदवार असणार, यावरून दोन्ही पक्षांत तीव्र मतभेद सुरू आहेत. त्यातच अनेक शिंदे सेनेतील माजी नगरसेवक आपले मुला-मुलींना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याच्या तयारीत असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. हा असंतोष आता केवळ चर्चेपुरता न राहता उघडपणे व्यक्त होऊ लागल्याने ठाण्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचे संकेत मिळत आहेत.

ठाणे महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप महायुतीतच लढवण्याचा निर्णय झाला असला, तरी जागावाटपाचा तिढा, उमेदवारीवरून सुरू असलेली नाराजी, घराणेशाहीविरोधी सूर आणि अंतर्गत गटबाजी यामुळे शिेंदे गटाची मोठी कसोटी सुरू झाली आहे. एकीकडे भाजप अधिक जागांवर दावा ठोकत असून, दुसरीकडे शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक प्रभागांवरील वर्चस्व आणि कार्यकर्त्यांची अस्वस्थता उघडपणे समोर येत आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्या प्रभाग क्रमांक १, ५ आणि ७ या तीन प्रभागांवरून एकमत होत नसल्याने महायुतीची घोषणा लांबणीवर पडत आहे. भाजपने या तिन्ही प्रभागांतील जागांवर दावा ठोकला असून, शिवसेनेने या मागण्यांना ठाम विरोध दर्शविला आहे.

प्रभाग क्रमांक १ मधील १२ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते. ही जागा खुल्या गटातील एकमेव असल्याने ती सोडल्यास विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांना संधी मिळणार नाही, असा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने ही मागणी फेटाळली आहे.

प्रभाग क्रमांक ५ मधून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक या निवडणूक लढवतात तसेच भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी या देखील उत्सुक असल्याने भाजपने देखील या प्रभागावर दावा केला आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील एका जागेवरही भाजपचा दावा कायम असल्यामुळे महायुतीत अंतर्गत वाद होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भास्करनगर परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.

त्यानंतर आता पुन्हा एकदा नौपाडा परिसरात शिंदे गटाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून, आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अंतर्गत संघर्षावर ३० डिसेंबरपर्यंत पडदा पडणार

ठाणे: शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि जागावाटपावरून सुरू असलेल्या वादावर येत्या ३० डिसेंबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे सूतोवाच माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अंतर्गत संघर्षावर झालेल्या संभाषणात त्यांनी पक्षीय घडामोडी आणि कार्यकर्त्यांमधील नाराजीवर सविस्तर भाष्य केले.

मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की, ठाण्यातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांना निलंबित केल्याच्या मुद्द्यावरून अनेक वर्षांचे कष्ट एका झटक्यात दुर्लक्षित केले जाऊ शकत नाहीत, ही बाब त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चुकीचे निर्णय दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. कार्यकर्त्याला पदावरून दूर केले असले तरी त्याला पक्षातून काढलेले नाही, त्यामुळे समन्वय साधून हा प्रश्न सोडवला जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे शिंदे यांनी सांगितले. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर असल्याने, त्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व राजकीय समीकरणे जुळलेली असतील आणि ठाण्यातील संघर्षावर तोडगा निघालेला असेल, असा विश्वास माजी महापौरशिंदे यांनी व्यक्त केला आहे.

युतीत लढतांना तडजोड करावी लागते

ठाण्यातील उमेदवारी आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, लोकांनी यापूर्वी अनेकदा घराणेशाहीला नाकारले आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असा नारा दिला जातो मात्र वेळेला त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रभाग क्रमांक ५ सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेमध्ये असलेल्या पेचावरही त्यांनी भाष्य केले. युतीमध्ये लढताना काही ठिकाणी तडजोड करावी लागते, मात्र वरिष्ठ पातळीवर युतीचा धर्म पाळला जाईल आणि कार्यकर्त्यांनाही तो मान्य करावा लागेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

नौपाडा परिसरातही तणावाचे वातावरण

ठाण्यातील एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नौपाडा परिसरातही तणावाचे वातावरण आहे. मागील निवडणुकीत भाजपने येथे चार नगरसेवक निवडून आणत आपली पकड मजबूत केली होती. युती झाली, तर किमान दोन प्रभागांमध्ये शिवसेनेला उमेदवारी मिळावी, अशी मागणी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडून होत असून, काहींनी भाजपविरोधात मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही पुढे ठेवला आहे.एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात पुन्हा सेनेचे वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल, तर किमान दोन जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी ठाम भूमिका आंदोलक पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

म्हस्के विरुद्ध गोगावले

खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध करत आनंदनगर परिसरात घोषणाबाजी झाली. मंत्री भरत गोगावले यांचे कार्यकर्ते प्रमोद गोगावले यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत शिंदे गटातीलच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यापूर्वीही माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या भावाच्या उमेदवारीला विरोध झाल्याने असंतोषाची ठिणगी पेटली होती.

शिवसेना एकसंध असताना नरेश म्हस्के हे कोपरी-आनंदनगर भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषवले आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव करत खासदारकी मिळवली. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील महापालिकेची जागा रिक्त झाली असून, अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र आशुतोष म्हस्के यांच्या नावाची चर्चा वाढताच विरोध उफाळून आला. आशुतोष म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारालाच विजयी करण्याचा ठाम संकल्प केला. रस्ते, पाणी, स्वच्छता, उद्याने आणि विकासकामांचा आढावा घेत महिलांनी शिवसेनेवरील आपला विश्वास व्यक्त केला. आमचा पाठिंबा शिवसेनेलाच आहे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

logo
marathi.freepressjournal.in