मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्याने शिवसैनिकांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला ठाण्यात लावलेले बॅनर काढण्यात आल्याने येत्या काही दिवसात हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे
मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्याने शिवसैनिकांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे बिगुल वाजवत शिवसेना नेतृत्वालाच आव्हान दिले असताना; आता ठाण्याच्या राजकारणातही मोठी उलटापालट झाली आहे. शिंदे समर्थकांनी थेट शिवसेनेतच बंड केले असल्याने शिंदे समर्थक आणि निष्ठावंत शिवसैनिक यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला ठाण्यात लावलेले बॅनर काढण्यात आल्याने येत्या काही दिवसात हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बहुतांशी माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन जाहीर केले; असले तरी त्यांचीही द्विधा मनस्थिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या हक्काच्या गडात बहुतांशी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी शिंदे यांना समर्थन जाहीर केले असले तरी खासदार राजन विचारे यांनी मात्र आपण मूळ शिवसेनेत असल्याचे स्पष्ट केल्याने शिंदे यांच्या विरोधात ते सध्या तरी उभे ठाकले असल्याचे चित्र आहे.

सध्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकहाती नेतृत्व आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व खासदार राजन विचारे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. गेले काही वर्षांपासून खासदार राजन विचारे यांनी शिंदे यांच्याशी जुळवून घेतले होते. दरम्यान काही वर्षांपूर्वी या दोघातून विस्तवही जात नव्हता, विचारे महापौर होते तेव्हाही ते कधी आपल्या बॅनर पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचे फोटीही लावायचे टाळत होते. त्यानंतर शिवसेना नेतृत्वाने दोघांना एकत्र करून मतभेद दूर केले होते. विचारे यांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारल्याचे दिसू लागले होते; मात्र गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी आहे.

ठाण्यात शिंदे गटात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असल्याचे उघड झालं असले तरी राजन विचारे मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने केंद्रीय प्रतोदपदी त्यांची नियुती केली आहे. तर बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला ठाण्यातून पहिला बॅनर जांभळी नाक्यावर विचारे यांनीच लावला तर त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी उघडपणे उद्धव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर कार्यक्रम घेतला. शिंदे यांच्या हक्काच्या ठाणे या गडातच विचारे यांनी त्यांना आव्हान दिले असल्याचे उघड झाले आहे.

राज्यात सत्ता बदल होऊन भाजप आणि शिंदेसमर्थक बंडखोर आमदारांचे सरकार सत्तेवर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शिवसैनिक आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचे समर्थन करत नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला मात्र सामनातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याची बातमी आली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी काही दिवसातच नरेश म्हस्के यांची पुन्हा जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली. सुभाष भोईर हे आमदार असताना २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांचे तिकीट कापण्यात आले त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होते, त्यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी केली आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात उघडपणे सहभागी झाले असल्याने त्यांच्यावरही मूळ शिवसेनेकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in