

वाडा : आमदार अपात्र निकालावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर पालघरमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. पालघरच्या हुतात्मा स्तंभ परिसरात उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनाविरोधात घोषणाबाजी करत रेल्वे स्टेशन ते हुतात्मा स्तंभापर्यंत रॅली काढली. रॅलीच्या सुरुवातीला शिंदे गटाने पालघरच्या हुतात्मा स्तंभाला अभिवादन केले. मात्र तानाशाही लोकांनी हुतात्मा स्तंभाला हात लावून तो अशुद्ध केला आहे, असे सांगत शिवसेनेने तेथे दुग्धभिषेक करून हुतात्मा स्तंभाचे शुद्धीकरण केले. शिंदे गटानेही रॅली काढली. यावेळी शिवसेना व शिंदे गट आमने सामने आल्यानंतर शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. शहरात तणावपूर्ण वातावरण होते. उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पोलिसांनी घटना व्यवस्थित हाताळल्यामुळे दोन्ही गटातील रॅली व्यवस्थित पार पडल्या. उपजिल्हाप्रमुख सुधीर तामोरे, दिलीप देसाई, राजेश कुटे, पालघर नगर परिषदेचे गटनेते कैलास म्हात्रे,महिला जिल्हा संघटक नीलम म्हात्रे, सहसंपर्क महिला नमिता राऊत, पंचायत समिती सभापती शैला कोलेकर, नगरसेवक राजेंद्र पाटील, नगरसेविका अनुजा तरे, राधा पामाळे, तालुकाप्रमुख गिरीश राऊत, नचिकेत पाटील, शहर प्रमुख भूषण संखे, युवा जिल्हाप्रमुख जस्विन घरत, राकेश पाटील आदी उपस्थित होते.