ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा पुन्हा दावा?

शिवसेनेकडून पुन्हा एकदा ठाणे लोकसभेवर दावा करण्यात आला असल्याचे नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे समोर आले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा पुन्हा दावा?
Published on

ठाणे : ठाणे आणि पालघर लोकसभा जागांवरून भाजप आणि शिवसेनेमधील विस्तव कमी होत नसताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा ठाणे लोकसभेवर दावा करण्यात आला असल्याचे नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बॅनरबाजीमुळे समोर आले आहे. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ही बॅनरबाजी माजी मंत्री गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यात करण्यात आली आहे, तर दुसरीकडे नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय असल्याने नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून हा मतदार संघ भाजपला न देता शिवसेनेकडेच राहावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री आग्रही असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशा तिघांचे महायुतीचे सरकार आहे. सरकारमध्ये भाजपच मोठा पक्ष असल्याने लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात भाजपच महत्वाची भूमिका बजावणार आहे. लोकसभा जागा वाटपाचा निर्णय हा दिल्लीमधूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून यापूर्वीच ४५ अधिक जागा निवडून आणण्याचे मिशन यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवर सतत भाजपकडून दावा सांगण्यात येत आहे. भाजपकडून अशाप्रकारचे दावे करण्यात येत असताना आता शिवसेनेकडून देखील नवी मुंबईत बॅनरबाजी करून ठाणे लोकसभेवर पुन्हा एकदा आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांचे निकटवर्तीय मानले जातात. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातील त्यांची सगळी सूत्रे म्हस्के यांनी आपल्या हातात घेतली. विरोधकांना अंगावर घेणे, मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना गळाला लावणे, पक्षाची बाजू मांडणे यासारखी कामे म्हस्के यांनी चोखपणे बजावली आहेत. ठाणे लोकसभेसाठी सध्या भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्रबुद्धे तसेच संजय केळकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाचीची चर्चा आहे. मात्र ठाण्यातून विधानसभेसाठी इच्छुक असणारे म्हस्के यांचे नाव सध्या ठाणे लोकसभेसाठीही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरात केलेली बॅनरबाजीमुळे भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मी विभागीय नेता असल्याने पदाधिकाऱ्यांनी प्रेमापोटी हे बॅनर लावले असतील. शिवसेनेला ठाणे लोकसभेची जागा मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. पक्ष सांगेल ती जबाबदारी घ्यायची माजी तयारी आहे. कारण मी पक्षाचा प्रत्येक आदेश पाळतो.

- नरेश म्हस्के, प्रवक्ते शिवसेना

logo
marathi.freepressjournal.in