नशाबाजांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी; माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

हिरानंदानी मिडोज् व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर कंटेनरमध्ये पोलीस चौकी सुरू करण्यासाठी पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला.
नशाबाजांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी; माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

ठाणे : घोडबंदर रोडवरील कासारवडवली किनाऱ्यावर झालेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईबद्दल शिवसेनेच्या माजी नगरसेविका व 'विहंग चॅरिटेबल ट्रस्ट'च्या अध्यक्षा परिषा प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच शहराच्या आणखी काही भागातील नशाबाजांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर दोन वर्षांपासून बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याचा आग्रह धरला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच ठाणे शहरातील ड्रग्ज माफियांविरोधात कडक कारवाईसाठी पावले उचलून कारवाई केली. रेव्ह पार्टीवरील कारवाईमुळे सामान्य नागरिक व तरुण मुलांच्या पालकांना खूप समाधान वाटले, असे माजी नगरसेविका व 'विहंग चॅरिटेबल ट्रस्ट'च्या अध्यक्षा परिषा सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. ठाणे हे 'मुख्यमंत्र्यांचे शहर' आहे. या शहरात शांतता राहणे महत्वाचे आहे. ठाणे शहरातील मध्यमवर्गीय व उच्चभ्रू वर्गातील मुलांमध्ये ड्रग्जचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे पुढील पिढीच्या भविष्याची चिंता वाटते, याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले.

गेल्या चार ते पाच वर्षांत ठाणे शहराच्या विविध भागात मद्यपी व नशाबाज तरुणांचा उपद्रव वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी वर्तकनगरमधील एका प्रतिष्ठित शाळेजवळ ड्रग्ज सापडल्याची घटना घडली होती. हिरानंदानी इस्टेट, उपवन तलावाच्या मागील बाजू, येऊरमधील काही भाग, फ्लॉवर व्हॅली, कोकणीपाडा भागात गर्दुल्ल्यांचा वावर सुरू आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी नशाबाजांविरोधात कारवाई केली होती. तर तत्कालीन पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनीही कारवाई करून अंकूश आणला होता. त्याच पद्धतीने पुन्हा कारवाई करण्याची मागणी सरनाईक यांनी केली. काही भागात रात्रीच्या सुमारास टोळ्यांमधील होणाऱ्या भांडणामुळे सामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

पोलीस चौकीसाठी सातत्याने पाठपुरावा

हिरानंदानी मिडोज् व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर कंटेनरमध्ये पोलीस चौकी सुरू करण्यासाठी पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर 'विहंग चॅरिटेबल ट्रस्ट'ने अद्ययावत सुविधा असलेली पोलीस चौकी उभारून तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले. परंतु, दुसऱ्या दिवसापासून चौकी बंद असून, ती आजतागत बंदच आहे. चौकी पुन्हा सुरू झाल्यास हिरानंदानी मिडोज, लोकपुरम, वसंत विहार, सिद्धचल, कोकणीपाडा परिसरातील सामान्य रहिवाशांना दिलासा मिळू शकेल. तसेच गुन्हेगार व नशाबाजांविरोधात तत्काळ कडक कारवाई करता येईल, अशी सूचना माजी नगरसेविका व 'विहंग चॅरिटेबल ट्रस्ट'च्या अध्यक्षा परिषा सरनाईक यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in