
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने आपल्याशी हातमिळवणी करून महाविकास आघाडी करावी, अशी इच्छा काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली होती. याबाबत शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारले असता, शिवसेना आदेशावर चालत असून शिवसेना सर्व प्रभागांत उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसैनिक काम करतील, असे लांडगे यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीत शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डोंबिवली पूर्वेकडील नांदीवलीतील राजेश्वरी कृपा येथील शिवसेना उपशहर प्रमुख अमित बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी लांडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी निवडणुकीसंदर्भात शिवसेनेला आघाडी करण्याची घाई नसल्याचेही त्यांनी नमुद केले.