डोंबिवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपशाखा कोपर व विभागीय कोपर व जुनी डोंबिवली शाखांचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी डोंबिवलीत केले. उद्धव ठाकरे हेच या शाखांचे उद्घाटन करणार होते, परंतु ते कार्य आता संजय राऊत यांनी पूर्ण केले. दरम्यान कल्याणमधील गोळीबार घटना प्रकरणी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून राजकीय फटकेबाजी केली. भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय कलहावर त्यांनी टीकेची झोड घेतली.
पश्चिमकडील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोपर उपशाखेचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राऊत म्हणाले, आपण स्वतःच्या शाखा नव्याने उभ्या करत आहोत. प्रत्येक शाखेत नवी शिवसेना उभी करत आहोत. शिवसैनिक शाखेतच आहे, तो कुठेही गेला नाही. यावेळी कोपरशाखा प्रमुख आकाश पाटील, महिला शाखा संघटक प्रियांका पाटील, पदाधिकारी रोहन पाटील, संजय नारकर, काशिनाथ पानवलकर, ज्योती म्हात्रे, कविता पानवलकर यांना पक्षवाढीसाठी काम करण्यास प्रोत्साहन दिले.
खासदार संजय राऊत यांनी डोंबिवली पश्चिम येथील मुख्य शाखेला भेट दिली. महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, उपशहरप्रमुख तानाजी मालुसरे, संजय पाटील, हेमंत म्हात्रे, दिलीप परदेसी, रोहित म्हात्रे, सुरज पवार, किरण मोंडकर, प्रियांका विचारे, अर्चना पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. डोंबिवलीत राऊत यांची हजेरी लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. राऊत यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. पदाधिकाऱ्यांनी शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.