मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना अधिकच वेग येऊ लागला आहे.
गिरीश राणे, सुभाष पवार, शैलेश वडनेरे, हेमंत रुमणे, कालिदास देशमुख यांचे छायाचित्र
गिरीश राणे, सुभाष पवार, शैलेश वडनेरे, हेमंत रुमणे, कालिदास देशमुख यांचे छायाचित्र
Published on

बदलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना अधिकच वेग येऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने चाचपणी सुरू केली असून इच्छुक म्हणून अनेक नावे पुढे येत आहेत. असे असतानाच आता शिवसेना ठाकरे गटानेही मुरबाडच्या जागेसाठी दावा केला आहे. त्यामुळे मुरबाडच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. लवकरच ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रत्येक घडामोडींवर इच्छुक उमेदवार बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात मिळालेल्या यशाने उत्साहित झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने तातडीने मुरबाड मतदारसंघात सक्षम उमेदवारासाठी चाचपणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानंतर इच्छुक उमेदवार म्हणून अनेक नावे पुढे येत आली. असे असतानाच आतापर्यंत याबाबत शिवसेना ठाकरे गट मात्र काहीसा शांत दिसत होता. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाकडूनही मुरबाडच्या जागेवर दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे बदलापूर शहर उपप्रमुख तथा कणकवलीसह संपर्क प्रमुख गिरीश राणे यांनी मुरबाडची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांच्याकडे केली आहे. यावर भोईर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे राहील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भोईर यांनी दिले असल्याचे गिरीश राणे यांनी स्पष्ट केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बदलापुरात मोठ्या संख्येने कोकणवासी वास्तव्याला असून कोकणवासी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुरबाडची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्यास निश्चितच विजयश्री खेचून आणणे शक्य होईल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे, प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्यानंतर आता प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे मुरबाडच्या उमेदवारीसाठी इच्छुक झाले आहेत. रुमणे यांनी पाच दिवसांपूर्वीच पक्षाचे प्रशासकीय मुख्य सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे इच्छुक उमेदवार म्हणून रीतसर अर्ज दाखल केला आहे. गेल्या २३ वर्षातील पक्षकार्याचा विचार करून पक्षाने उमेदवारी द्यावी,अशी विनंती आपण केली असून लवकरच यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार व अन्य नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुभाष पवार यांच्या एंट्रीबाबत संभ्रम कायम

शिवसेना भिवंडी लोकसभासह संपर्क प्रमुख व मुरबाडचे माजी आमदार गोटिराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार मुरबाड विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र मुरबाडची जागा सध्या भाजपकडे असून आमदार किसन कथोरे यांनी या मतदारसंघात मागील निवडणुकीत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपकडेच राहण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा लढविण्यासाठी सुभाष पवार लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून रंगत आहेत. मात्र याबाबत सुभाष पवार यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी सुभाष पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

मुरबाड विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी अशी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्याची मागणी आहे. कार्यकर्त्यांची ही भावना पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहचवली आहे. यावर पक्ष जो निर्णय घेईल त्यानुसार काम करू. - गिरीश राणे, बदलापूर शहर उपप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

logo
marathi.freepressjournal.in