पाणी टंचाई विरोधात शिवसेनेचा भव्य मोर्चा, शेकडो महिला व नागरिक मोर्चात सहभागी

बारवी डॅम ओव्हरफ्लो होत असून देखील पाणी टंचाई का - संतप्त नागरिकांचा प्रशासनाला सवाल
पाणी टंचाई विरोधात शिवसेनेचा भव्य मोर्चा, शेकडो महिला व नागरिक मोर्चात सहभागी

उल्हासनगर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेले बारवी धरण ओव्हरफ्लो झाले असून यावर्षी पाणी टंचाई भासणार नाहीं असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, मात्र तरी देखील शहरातील काही भागामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. वारंवार पत्रव्यवहार करून देखील पालिका प्रशासन पाणी टंचाईचा प्रश्न सोडणीव्यात अपयशी ठरत आहे. याबाबत उल्हासनगर महापालिकेला जाब विचारण्यासाठी आज शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चात वसुधा बोडारे, शितल बोडारे, मनीषा राजपूत, शुभांगी शिंगटे, रेखा पाटील, सोनाबाई टेकाडे, रजनी माळी, दिपाली महाजन, वंदना वाघ, नंदा पाटील, पुष्पलता कोळी, कविता निकुंभ, माधूरी भंगाळे, मीनाताई पाटील, प्रमिला शिरसाठ, राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, शेखर यादव, विजय सावंत, बापू सावंत, प्रा. प्रकाश माळी, निवृत्ती पाटील, निखिल पाटील, देवेंद्र तरे, गणेश भारंबे, राजू राणे, रितेश बडगुजर, सुधीर कांबळे यांच्यासह शेकडो महिला व नागरिक यावेळी उपस्थित होते.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कॅम्प नंबर 4 परिसरातील वसिटा कॉलनी, शिवनगर, मिलिंदनगर, श्रीरामनगर येथील सेक्शन 28 व 29, जागृती कॉलनी, 14 नंबर शाळा परिसर, रोमा परिसर, संतोषनगर, गणेशनगर, महादेवनगर, बंजारा कॉलनी, गीता कॉलनी यासह आजूबाजुच्या परिसरात तीव्र पाणी टंचाई असल्याचे दिसून येत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाकडून अनेक ठिकाणी परिसराला पाणी पुरवठा करण्याची वेळ निश्चित नाहीं. त्यामुळे पाणी नक्की कोणत्या वेळी येईल याबद्दल लोकांना माहिती नसते.

श्रीरामनगर परिसरात व इतर विभागात पाण्याचा पुरवठा अनियमित होत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. पाण्याच्या पाईप लाईनमध्ये खराबी, कोणत्याही वेळेस पाणी सोडणे, पाणी कमी वेळ येणे, पाणी कमी दाबाने येणे अश्या अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. या संदर्भात पाठपुरावा केला तर संबंधित अभियंता तसेच कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देतात. पाणीपुरवठा विभागावर प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नसून कामाची ऐसी की तैसी परिस्थिती निर्माण झाली आहे. अखेर पालिका प्रशासनाला याबद्दल जाब विचारण्यासाठी आज संतोषनगर शिवसेना शाखा ते उल्हासनगर महापालिका असा भव्य मोर्चा काढण्यात आला.

सध्याच्या परिस्थिती मध्ये पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने अश्या परिस्थिती मध्ये त्रस्त नागरिकांना काय उत्तर द्यावे हे आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीना कळेनासे झाले आहे. शहरामध्ये अनेक प्रकारच्या खूप समस्या आहेत परंतु प्रशासन कोणत्याही प्रकारे दखल घेत नाही. खड्ड्यांचे साम्राज्य, पथदिवे बंद असल्याची समस्या, घाणीचे साम्राज्य पसरले असून वेळोवेळी कचरा न उचलने त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे तसेच ह्या शहरामध्ये भांडवली मूल्य आधार कर प्रणाली चालू केल्याने नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात असंतोष निर्माण झाला असल्याचा आरोप माजी विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांनी केला आहे.

वास्तविक पाहता अजीज शेख यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनावर पगडा ठेवून शहरातील सर्व समस्यांमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, मात्र पूर्वीच्या परिस्थिती मध्ये काही फरक पडला नाही, परंतु समस्यांमध्ये अधिक प्रमाणात वाढ झालेली असून प्रशासन ढिम्म झालेले असल्याचे दिसुन येत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.

याबाबत आम्ही पालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन, पत्र व्यवहार करून, समस्यांबाबत चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशी वार्तालाप देखील केला होता. मात्र त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आजचा हा भव्य मोर्चा महानगरपालिकेच्या महानगरपालिकेवर आणलेला असल्याचे धनंजय बोडारे यांनी आयुक्तांना स्पष्ट केले.

दरम्यान शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेत पालिका आयुक्त अजीज शेख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर पाणी समस्या सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in