धक्कादायक : भिवंडीतील कारखान्यांत बांगलादेशी नागरिक कामाला!

भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या मोती कारखान्यांत बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याची धक्कादायक माहिती
धक्कादायक : भिवंडीतील कारखान्यांत बांगलादेशी नागरिक कामाला!

भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या मोती कारखान्यांत बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारखाना मालक स्थानिक नागरिकांना काम न देता बांगलादेशी नागरिकांना रोजगार देत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस विभागासह संबंधित कार्यालये अनभिन्न आहेत. मोती कारखान्यात अवैधरित्या रसायनाचा साठा केल्याने अनेकवेळा आगी लागल्याच्या घटना शहरात व परिसरात घडल्या आहेत. अशा अवैधरित्या मोती उत्पादन आणि त्यांना रंग देण्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची सरकारी कार्यालयात नोंद होत नसल्याने अशा कारखान्यात कोण काम करतात? याची माहिती संबंधित कार्यालयास मिळत नाही. तर अनेक कारखान्याची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार सुरक्षा व आरोग्य विभाग आणि स्थानिक सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या सरकारी कार्यालयात न झाल्याने शहरात सर्व अलबेल सुरू आहे.

भिवंडीत गेल्या अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी बांगलादेशी नागरिक वास्तव्य करून आहेत; मात्र ते कोणत्या गुन्ह्यात सापडले, तर त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. इतरवेळी पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. शहरात मोती कारखान्याशिवाय इतर ठिकाणी देखील बांगलादेशी नागरिक कार्यरत आहेत. त्याकडे संबंधित कार्यालयांचे दुर्लक्ष असून अशा कामगारांची शहानिशा न करता अनेक कारखानेधारक आणि कंपनी व्यवस्थापक केवळ आपले काम काढून घेण्यासाठी कमी पगार देऊन बांगलादेशी नागरिकांना कामावर ठेऊन घेतात. त्यामुळे बांगलादेशी नागरिकास गैरप्रकार रोजगार व आश्रय दिल्याप्रकरणी कंपनी आणि कारखाना मालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यास बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य कमी होईल, असे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जाते.

३००पेक्षा जास्त कारखाने

भिवंडी शहरात आणि परिसरात पावडर आणि प्लास्टिक दाण्यापासून मोती बनवून त्यास रंग देऊन विक्री करणारे सुमारे ३००पेक्षा जास्त कारखाने आहेत. या कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक या क्षेत्रात रोजगार मिळावा, म्हणून मजबुरीने काम करीत आहेत; मात्र बांगलादेशातून रोजगारासाठी भारतात आलेले बांगलादेशी नागरिक अशा कारखान्यात संरक्षण आणि सुरक्षितता म्हणून काम करीत आहेत. मोती कारखान्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्यांचा व वस्तूंचा उपयोग केला जात असून, अशा रसायनांची हाताळणी बांगलादेशी नागरिक करीत असल्याने त्यांना मालकवर्ग रोजगार देतात.

भिवंडीमधील प्लास्टिक मोती कारखान्यात बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याची माहिती आम्हास मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त, भिवंडी परिमंडळ -२

logo
marathi.freepressjournal.in