भिवंडी : शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर वेळेची बंदी असतानाही, वाहतूक पोलिसांकडून ३०० रुपयांचा "हफ्ता" घेऊन अवजड वाहनांना रस्त्यावर प्रवेश दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
वाहतूक कोंडीत अडकलेले अॅड. भारद्वाज चौधरी यांनी फेसबुक लाईव्हद्वारे हा प्रकार उघडकीस आणला. त्यांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये एका ट्रक चालकाने थेट कबुली दिली की, त्याच्याकडून ३०० रुपये घेऊन पोलिसांनी त्याला रस्ता मोकळा केला. या प्रकरणामुळे भिवंडीतील वाहतूक कोंडीमागील खरी जबाबदारी वाहतूक पोलिसांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंजुरफाटा, वळगाव, दापोडे, मानकोली, पिंपळस ते खारेगाव ब्रिज अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.
या व्हिडिओची वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून भिवंडीतील वाहतूक व्यवस्था सुधारावी, अशी मागणी चौधरी यांनी शासनाकडे केली आहे.
अवजड वाहनांवरील निर्बंध नावापुरते
वाहतूक विभागाने अवजड वाहनांवर वेळेचे निर्बंध लावलेले असून त्यासाठी वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. तरीही पोलिसांकडून हफ्ता घेऊन वाहनांना प्रवेश दिला जात असल्याने निर्बंध नावापुरते असल्याचे बोलले जात आहे.