
मागील काही काळापासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. महिलांसाठी राज्याचं वातावरण दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललं आहे. असं असताना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कॅबमध्ये एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनीआरोपी कॅब चालकाला अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. त्यानंतर आरोपी राकेश जयस्वाल याला नवी मुंबईतील ऐरोलीमधून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार पीडित २३ वर्षीय तरुणी ही कल्याण पूर्वेतील नेतेवली भागात राहत असून ती नवी मुंबई येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे तरुणी शुक्रवारी कामावर गेली होती. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास कंपनीमधील काम आटोपून घरी जाण्यासाठी पीडित तरुणीने कॅब कंपनीची कार बुक केली. कॅबमधून तरुणी घरच्या दिशेने प्रवास करत असताना कार कल्याण शीळ मार्गावरील सुचक नाका येथे आली. त्यावेळी तरुणी कारमध्ये झोपली होती. ही संधी साधताच चालकाने पीडित तरुणवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणींने आरडाओरडा केला. दरम्यान, घाबरल्याने नराधम कॅब चालकाने पीडित तरुणीला पाटेच्या तीन वाजल्याच्या सुमारास सुचक नाका रस्त्यावर सोडून पळ काढला.
यावेळी भयभीत झालेल्या पीडित करुणीने कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठले. पीडित तरुणीने कॅब चालकाविरोधात भादवि कलम ३५४, ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार कुठल्या दिशेला गेली हे दिसून आलं. त्यानंतर पोलिस पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. अखेर कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी कॅबचालक राकेश जयस्वाल याला नवी मुंबई ऐरोली येथून बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्याक पोलीस निरीक्षक एस. डी. डोके करीत आहेत. मात्र या घटनेमुळे महिला प्रवाशी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.