मराठीत पाट्यांबाबत अजूनही दुकानदार उदासीन; उपायुक्तांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

मनपा उपायुक्त नाईकवाडे पुढे म्हणाले की, शहरातील दुकाने व आस्थापनांना वारंवार मराठी पाट्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत
मराठीत पाट्यांबाबत अजूनही दुकानदार उदासीन; उपायुक्तांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याबाबत संबंधित दुकानदार उदासीन असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत मनपा उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या सभागृहात मराठी पाट्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करतांना नाईकवाडे यांनी ही तीव्र नाराजी व्यक्त केली, यावेळी मनपाचे प्रशासकीय अधिकारी, शहरातील व्यापारी, मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

मनपा उपायुक्त नाईकवाडे पुढे म्हणाले की, शहरातील दुकाने व आस्थापनांना वारंवार मराठी पाट्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे देखील मराठी पाट्या लावण्याबाबत स्पष्ट आदेश आहेत, गेल्या बैठकीत शहरातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांनी या आदेशाची अंमलबजावणी करणार असल्याचे मान्य केले होते, मात्र शहरात मराठी पाट्या लावण्याबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, या बाबतीची मुदत संपल्यानंतर कोणाचेही म्हणणे आम्ही ऐकून घेणार नाही व सरळ कारवाई करण्यास सुरुवात करणार असल्याचा ईशारा प्रशासनाच्या वतीने नाईकवाडे यांनी दुकानदारांना दिला आहे. या बैठकीला मनपाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, मनसेचे बंडू देशमुख, संजय घुगे, मैनुद्दीन शेख, माजी नगरसेवक किशोर वनवारी, उद्योजक राजा गेमनानी तसेच विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in