
अतुल जाधव /ठाणे
स्मार्ट सिटी अशी ओळख सांगणाऱ्या ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळा स्मार्ट होणे दूरच राहिले मात्र पालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या तब्बल ७ हजार ४० विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमागे केवळ ५८ शिक्षकच कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या शैक्षणिक वर्षाच्या पटसंख्येनुसार ८७ शिक्षकांची तर ९४ सहशिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र शिक्षकांची पुरेशी संख्या नसल्याने आता तासिका तत्वावर ७८ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव देखील शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या मराठी, उर्दू, इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या माध्यमिक शाळांकरिता ७८ शिक्षकांची तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात शाळा व्यवस्थापन व विकास समितीमार्फत नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ठाणे पालिकेच्या मराठी माध्यम १२, उर्दू माध्यम-४, इंग्रजी माध्यम -४ व हिंदी माध्यम १ व मराठी माध्यम रात्रशाळा २ अशा एकूण २३ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. सद्यस्थितीत माध्यमिक शाळांमध्ये पुरेशी शिक्षक संख्या उपलब्ध नाही. २३ माध्यमिक शाळांपैकी ७ शाळांना अनुदानित तर ६ शाळांना विनाअनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ८ शाळांपैकी ६ शाळांना २१ नोव्हेंबर-२०२२ रोजी स्वयंम अर्थसहाय्य तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. २ मराठी माध्यमाच्या रात्रशाळा कार्यरत असून या २ शाळांमध्ये अर्धवेळ शिक्षक नियुक्त केल्याने तासिका शिक्षक देण्यात येत नाहीत. त्यामुळे माध्यमिक शाळांमध्ये कमी पडत असलेल्या शिक्षकांची तासिका तत्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षकांसाठी १ कोटी ५० लाखांची तरतूद
सद्यस्थितीत एकूण २१ शाळांमध्ये ५१ नियमित सहशिक्षक कार्यरत असून त्यापैकी १९ सहशिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली असल्याने ७८ शिक्षक तासिका शुल्कावर उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. आऊट सोर्सिंगदवारे शिक्षक घेण्यासाठी १ कोटी ५० लाख इतकी तरतूद आहे. तासिका शुल्कावर ७८ शिक्षक उपलब्ध झाल्यास शाळा व्यवस्थापन व विकास समितीमार्फत त्या त्या शाळांना आवश्यकतेनुसार तासिका शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.