निवडणूक काळात मोबाईल टॉवरसह इंटरनेट सेवा बंद करा

निवडणूक काळात मोबाईल टॉवरसह इंटरनेट सेवा बंद करा

ईव्हीएम मशीनबाबत सर्वांनाच संभ्रम असल्याचे सांगत आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ (बाळ्या मामा) म्हात्रे...

भिवंडी : ईव्हीएम मशीनबाबत सर्वांनाच संभ्रम असल्याचे सांगत आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी २० मे रोजीच्या मतदानाच्या दिवशी मोबाईल टॉवर बंद ठेवण्यासह ४ जूनपर्यंत ईव्हीएम मशिन्स असलेल्या स्ट्राँग रूमच्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची मागणी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांना एका लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे बाळ्या मामा 'सही पकडे हो'ची प्रतिक्रिया मामांच्या समर्थकांकडून उमटत आहे.

पत्रान्वये मतदारांच्या मनात ईव्हीएम मशिन्सविषयी समज-गैरसमज आहेत. मतदानाचा हक्क बजावताना मतदाराचे समाधान होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वृत्तपत्रातील बातम्या आणि सामाजिक माध्यमांवरील व्हिडीओ पाहून मतदारांच्या मनात ईव्हीएम मशीनविषयी संभ्रम असल्याचे मामांनी म्हटले आहे. त्यामुळे मतदारांचा पारदर्शक आणि भयमुक्त मतदानावर विश्वास बसावा याकरिता सोमवारी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या अखत्यारित येणारे सर्व मोबाईल टॉवर्स सकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळेत म्हणजेच शेवटचा मतदार मतदान देईपर्यंत बंद ठेवावेत.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व सीलबंद ईव्हीएम मशीन्स मत मोजणीच्या ज्या स्ट्राँग रूममध्ये ४ जूनपर्यंत सुरक्षित ठेवल्या असतील तेथील इंटरनेट सेवा जॅमर लावून बंद कराव्यात. त्यामुळे निकालानंतर मतदारांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कायम राहावी, याकरिता तत्काळ संबंधितांना आदेश देण्याची नम्र विनंती सुरेश उर्फ (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in