ठाण्यात गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ; पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह

ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हेगारी रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करतात. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
ठाण्यात गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ; पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह

सांस्कृतिक ठाण्याची ओळख आता गुन्हेगारांचे ठाणे अशी करून द्यावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ हा नागरिकांच्या त्याचप्रमाणे पोलिसांच्या देखील चिंतेचा विषय ठरला आहे. आकडेवारीनुसार ठाणे पोलीस आयुक्तालयात आकडेवारीने कळस गाठला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून एक हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाल्याने ठाणे पोलिसांसमोर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

कल्याण शहरात शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडण्यात आल्यानंतर ठाणे हादरले. जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीचे चित्र दाखवणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर नसलेला धाक हा देखील चिंतेचा विषय ठरला आहे. गुन्हेगार शस्त्र घेऊन शहरात फिरत असताना पोलीस नेमके करतात काय? हा प्रश्न विचारला जात आहे.

एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत असताना गुन्ह्यांची उकल होण्याची संख्या देखील नगण्य असल्याने गुन्हेगार पोलिसांना शिरजोर झाले आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दाखल गुन्ह्यामध्ये हत्येच्या गुन्ह्यांची संख्या सात असून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हत्येचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात देखील वाढ झाली असून एकूण २१ गुन्हे दाखल झाले असून २० गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तर बलात्काराचे २४ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या पैकी १७ गुन्ह्यात पोलिसांना आरोपींना गजाआड करण्यात यश मिळाले आहे. आकडेवारीनुसार दाखल करण्यात आलेल्या २५५ गुन्ह्यापैकी ५० गुन्हे म्हणजेच अवघे १९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

मागील वर्षांत जानेवारी महिन्यात हत्येचे चार तर हत्येचा प्रयत्न या संदर्भात १४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती तर यंदाच्या जानेवारीत या गुन्ह्यात वाढ झाली असल्याचे दिसत आहे. हत्येच्या गुन्ह्यात तीन, तर हत्येचा प्रयत्न करणे यामध्ये सातने वाढ झाली आहे. जानेवारीत फसवणुकीचे गुन्हे देखील वाढले असून ७६ फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हेगारी रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करतात. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ठाणे शहरातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नुकत्याच मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र अधिकारी बदलला म्हणून गुन्हेगारी कमी होणार नाही. पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारांची धरपकड करून त्यांची शहरातील रस्त्यावर धिंड काढली. त्यामुळे नागरिकांमध्ये गुन्हेगारांची भीती कमी होऊन पोलीस विभागाबद्दल विश्र्वास वाढला. पुणे शहरात गुन्हेगारांची धिंड काढली, त्याचप्रमाणे ठाणे शहरात देखील काढण्यात यावी अशी ठाण्यातील नागरिकांची मागणी आहे. पोलीस खाते मात्र गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा करत असले तरी असला तरी गुन्हेगारी नियंत्रणात नाही हे वास्तव आहे.

पोलिसांची निष्क्रियता गुन्हेगारांच्या पथ्यावर

दुचाकीस्वारांना तसेच मालाची वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोचालकांना टिपण्यासाठी खांबा मागे, झाडा मागे आडोशाला लपणारे पोलीस गुन्हेगारांना पकडण्यात अयशस्वी का ठरतात, असा प्रश्न ठाण्यात नागरिकांनकडून विचारण्यात येत आहे. चौकाचौकात टोळी करून उभ्या असणाऱ्या पोलिसांना चोरटे कसे गुंगारा देऊन पळून जातात, याचीच चर्चा सध्या ठाण्यात सुरू आहे. गुन्हेगार शस्त्र घेऊन बिनधास्त शहरातून फिरत असताना वाहतूक पोलीस मात्र तटस्थ भूमिकेत राहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी दुचाकीचालकांचे लायसन्स तपासण्यासोबतच संशयितांची झडती घेतल्यास हत्या, हत्येचे प्रयत्न, यासारखे अनेक गंभीर गुन्हे टळू शकतात, अशी चर्चा पोलीस दलातील अधिकारी करत आहेत.

पोलिसांची निष्क्रियता नवीन गुन्ह्यांसाठी आमंत्रण

गुन्हेगार बिनधास्त रस्त्याने घातक शस्त्रे घेऊन फिरत असताना पोलिसांना ते का दिसत नाही, असाही प्रश्न चर्चेला आला आहे. या प्रश्नामुळे गस्तीवर असणाऱ्या तसेच चौकाचौकात उभे राहणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यावर, सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील कोणत्याही वर्दळीच्या भागात फिरल्यास टपोरी टाइपचे तरुण बिनधोक ट्रिपल सिट फिरताना दिसतात. चौकाचौकात सिग्नल तोडणाऱ्या सावजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी कर्तव्यनिष्ठता दाखवून त्यांची झाडाझडती घेतल्यास शहरात रोज अनेक शस्त्रधारी गुन्हेगारांची मानगुट पकडण्यास मदत होऊ शकते. मात्र, गुन्हेगारांना पकडण्याची आपली जबाबदारी नाही, असा वाहतूक पोलिसांचा अविर्भाव असतो. त्यामुळे शस्त्र घेऊन फिरणारे गुन्हेगार मोकाट असून पोलिसांची निष्क्रियता नवीन गुन्ह्यांना आमंत्रण देत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in