मोखाडा : मोखाड्यात बोगस डॉक्टरांची संख्या अधिक असल्यामुळे बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दीड महिन्यात दोन बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गाव पाड्यांत दुकाने मांडून बसलेल्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून बहुतांश बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने बंद करून भूमिगत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
आदिवासी भागात गाव, पाड्यांमध्ये वैद्यकीय सेवेचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्याचा फायदा घेऊन वेगवेगळ्या राज्यातील बोगस डॉक्टरांनी गाव, पाड्यांमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक वर्षे व्यवसाय करून त्यांनी मोठी माया देखील गोळा केली आहे. या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून कारवाईबाबत चालढकल करण्यात येत असल्याचे चित्र होते. अखेर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी मोखाड्यात ७ डिसेंबरला स्वतः येऊन कारवाई केली आहे. त्यांनी बोगस डॉक्टरांचा पर्दापाश करून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर प्रत्येक तालुकास्तरावर बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दीड महिन्याच्या अंतराने २३ जानेवारीला तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीने मोखाड्यातील मोरचोंडी येथील बोगस दवाखान्यावर छापा टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या धडक कारवाईमुळे गाव, पाड्यांत दुकाने थाटून बसलेल्या बोगस डॉक्टरांनी कारवाईचा धसका घेत, आपली दुकाने बंद करून पळ काढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार तालुक्यात बोगस डॉक्टरांची शोध मोहीम सुरू केली आहे. बोगस डॉक्टरांची माहिती मिळताच त्याची पडताळणी करून बोगस डॉक्टर शोध समितीमार्फत तेथे छापा टाकण्यात येत आहे. मोरचोंडी येथील बोगस डॉक्टरांबाबत देखील माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरूच ठेवणार आहे.
- डॉ. भाऊसाहेब चत्तर, तालुका वैद्यकीय अधिकारी
तालुक्यात काही ठिकाणी अजूनही बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. बोगस डॉक्टरांसह काही डॉक्टर गरीब रुग्णांना इंजेक्शन आणि सलाईनचा डोस देत प्रत्येकी हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करत आहेत. त्याला पायबंद घालावा अशी तक्रार मी सर्वसाधारण सभेत केली आहे. आता पुन्हा तशी तक्रार करणार आहे.
-हबीब शेख, जिल्हा परिषद सदस्य