सिंगल यूज प्लास्टिक जनावरांना घातक; वापरास बंदीचा नियम जव्हारमध्ये कागदावरच

नागरिक किराणा सामान, भाजीपाला, फळे, फुले, छोट्या, मोठ्या घरगुती वस्तू आणायच्या झाल्यास सर्रास प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आणतात.
सिंगल यूज प्लास्टिक जनावरांना घातक; वापरास बंदीचा नियम जव्हारमध्ये कागदावरच

जव्हार : जव्हार शहरात ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या सर्रास रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत फेकले जात आहेत, विशेष म्हणजे, असे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे असल्याने हे वापरास बंदी आहे. त्याचा वापर करताना कुणी आढळले तर दंड होतो. पण, हा नियम येथे कागदावरच असल्याचे चित्र आहे. त्याचा विपरीत परिणाम निसर्गासह जनावरांवर होत आहे. खाद्यपदार्थांसोबत प्लास्टिक खाण्यात आल्यामुळे जनावरे आजारी पडणे तसेच दगावण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.

जव्हार शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून हजारो नागरिक आपापली विविध कामे करण्यासाठी येत असतात. त्यामुळे रोजच शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, शिवाय वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत गरजेप्रमाणे प्लास्टिकचा वापरही वाढला आहे. हा प्रकार शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे. शिळे अन्न, खराब भाजीपाला आदींची नागरिक सकाळी उठून विल्हेवाट लावतात. त्यासाठी, कामावर निघताना सोबत खराब भाजीपाला, टाकाऊ पदार्थ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरवून मोकळ्या जागेत फेकून देतात. त्यात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचाही समावेश असतो. भूकेपोटी मोकाट जनावरे, पक्षी, प्राणी हे खाद्यपदार्थ खाऊन फस्त करतात. परंतु, हे खाद्यपदार्थ खाताना त्यासोबत त्यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्याही जातात.

नागरिक किराणा सामान, भाजीपाला, फळे, फुले, छोट्या, मोठ्या घरगुती वस्तू आणायच्या झाल्यास सर्रास प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आणतात. त्यातून सर्वत्र प्लास्टिक पसरलेले आढळून येते. प्लास्टिकच्या वापरामुळे त्याचा निसर्गावरही मोठा दुष्परिणाम होत आहे. परिसरातील सर्व मोकळ्या जागा, शेतजमिनी प्लास्टिकने व्यापल्या आहेत. जनावरे चरताना त्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. या प्लास्टिकच्या गोळ्यामुळे जनावरांच्या अन्ननलिकांसह श्वसनक्रियेचे काम थांबते. त्यातून पचनसंस्था ठप्प होते. त्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्लास्टिक पिशव्यांचा भस्मासुर थांबवून निसर्ग वाचविण्याची गरज परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा जनावरांच्या पोटात गोळा होतो. त्यामुळे जनावरे दगावण्याच्या घटना घडतात. आमचा पिढीजात पशुपालनाचा व्यवसाय आहे. गुरांच्या निघणाऱ्या दुधाच्या व शेणखताच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर आमच्या कुटुंबाची गुजराण होते. गुरे चरताना गवतासोबत त्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. कालांतराने त्याचा पोटात गोळा होऊन जनावरांसह छोटी वासरेही मरण पावतात. त्यातून दरवर्षी आम्हाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवून प्लास्टिकचा वापर थांबवावा. त्यातून निसर्गसंपदा वाचवावी.

- नरेंद्र मुकणे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा पशुपालक, जव्हार

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन वन व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेऊन प्लास्टिक वापरावर बंदी घातली होती. प्रशासनाने काही काळ त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. अगदी त्यातून दंडाची कारवाई करून लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला. कालांतराने दुर्लक्ष झाल्याने पुन्हा प्लास्टिकचा वापर वाढला आहे. त्यामुळे, पशुधन धोक्यात येत आहे. प्लास्टिकमध्ये बांधून टाकलेले अन्न खाताना त्या अण्णा सोबत प्लास्टिक पण जनावराच्या पोटात जाते व कालांतराने खूप जास्त प्लास्टिक खाल्ल्यामुळे वारंवार फुगते व अन्नपचन होत नाही. यावर त्वरित उपचार करून जर प्लास्टिक जनावराच्या पोटातून काढले नाही, तर जनावर कालांतराने मरण पावते.

- डॉ. जयकुमार सातव, पशुधन विकास अधिकारी, जव्हार

logo
marathi.freepressjournal.in