ठाणे : नाशिक लोकसभेच्या जागेसाठी पुन्हा आग्रही असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जोरदार प्रदर्शन केले.
नाशिकच्या जागेबाबत महायुतीमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नसल्याने ही जागा शिवसेनेला मिळावी, तसेच या ठिकाणी पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी गोडसे यांनी दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणाही यावेळी गोडसेंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. गोडसे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नाशिकहून आले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गोडसे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यानंतर नाशिकच्या जागेबाबाबत महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांशी सकारात्मक चर्चा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गोडसे यांना दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर समाधान व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या शिवेसेनेच्या मेळाव्यातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसेच उमेदवार असतील, अशी घोषणा केल्याने नाशिक भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. नाशिकमध्ये सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा उभे राहून हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. त्यात रविवारी स्वतः विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास स्थानी धडकल्याने नाशिकमधील जागेचा मुद्दा आणखी तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हेमंत गोडसे यांची भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या संदर्भात आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला पुन्हा एकदा सरकार स्थापन करायचे आहे, देशात ४०५ तर महाराष्ट्रात ४५ पार करायचे आहेत. प्रत्येक जागा आपल्याला महत्त्वाची आहे, एक एक उमेदवार आणि खासदार आपल्याला महत्त्वाचा आहे, अनेक जागांवर बारीक चर्चा सुरू आहे, गृहमंत्री आणि मोदी साहेब स्वतः यामध्ये लक्ष घालत आहेत. काही जागांवर आणि ठाण्याच्या जागेवर सुद्धा चर्चा सुरू आहे त्यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल, वरिष्ठ तुमच्या भावनांचा विचार नक्कीच करतील, तुमच्या भावनांशी मी सहमत आहे तुमच्या भावना, त्या माझ्या भावना तुमचा आग्रह तो माझा आग्रह आहे. ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेसाठी महायुतीतील नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले असून लवकरच निर्णय घेणार असून आपल्या कुठल्याही खासदारावर अन्याय होणार नाही याची काळजी हा एकनाथ शिंदे घेईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यानी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आपण समाधानी असल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी महायुतीसोबत सकारात्मक चर्चा करून कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या असून महायुतीच्या नेत्यांसमोर ते मांडतील आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे गोडसे म्हणाले.
गोडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना इथे येण्याची आवश्यकता नव्हती. हे खरं आहे. नाशिकच्या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र याबाबत चर्चा सुरू असून महायुतीसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये आगळेवेगळे वातावरण निर्माण झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिक आपला बालेकिल्ला आहे, नाशिकवर धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेबांचे प्रेम होते आणि माझेही आहे. नाशिकची जागा आपल्या धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे, ही माझी इच्छा आहे, बातम्यांवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मी व माझ्या कार्यकर्त्यांनी भावना पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडे केले आहे. कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती माझी आहे, त्यामुळे माझ्या भावना मी वरिष्ठ पातळीवर व्यक्त करेन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, महायुतीतील सर्व ताकद एकत्र झाली तर मोठ्या मताधिक्याने नाशिकच्या जागेचा विजय होईल.
-हेमंत गोडसे, विद्यमान खासदार