शाळेच्या इमारतीवर सौरऊर्जा पॅनल बसवणार; महापालिका शाळेचा वीज बचतीसाठी पुढाकार, सोलर पॅनलसाठी ५० लाखांचा खर्च

मीरा-भाईंदर महापालिका कार्यालय, शाळा, रुग्णालय, आरोग्य केंद्र, अग्निशमन विभाग, रस्त्यावरील विजेचे खांब यासाठी वीज वापरते.
शाळेच्या इमारतीवर सौरऊर्जा पॅनल बसवणार; महापालिका शाळेचा वीज बचतीसाठी पुढाकार,
सोलर पॅनलसाठी ५० लाखांचा खर्च

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या शहरात ३६ शाळा आहेत. वीज बचत करण्यासाठी महापालिका शाळेवर सौरऊर्जा पॅनल बसवण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंजूर केला आहे. या सोलर पॅनलसाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

मीरा-भाईंदर महापालिका कार्यालय, शाळा, रुग्णालय, आरोग्य केंद्र, अग्निशमन विभाग, रस्त्यावरील विजेचे खांब यासाठी वीज वापरते. या विजेसाठी महापालिकेला मोठा खर्च येतो. या वीज देयकावर दर महिन्याला होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चात बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा-भाईंदर शहरात विविध उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय हवा शुद्धीकरण उपक्रमांतर्गत कोट्यवधींचे अनुदान महापालिकेला मिळाले आहे.

शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून शहरात विविध ठिकाणी कारंजे उभारले आहेत. तसेच दुभाजक व रस्त्यावरील धूळ स्वच्छ करण्यासाठी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. यानंतर पुढील टप्प्यात, महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या विजेचे दर निश्चित करण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

१७ इमारतींवर सोलर पॅनल

महापालिका शाळेच्या १७ इमारतींवर व स्व. इंदिरा गांधी रुग्णालयावर सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय मनपा आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे. या सोलर पॅनलसाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. शहरात महापालिकेच्या अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्तांमध्ये दर महिन्याला वीज मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. या विजेसाठी दर महिन्याला महापालिकेला कोट्यवधी रुपये भरावे लागतात. या खर्चात बचत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलर पॅनलमधून तयार होणारी वीज ही वीज कंपनीला देण्यात येणार आहे. ही मिळणारी रक्कम महापालिकेला येणाऱ्या वीज देयकातून वजा केली जाणार आहे.

महापालिकेने कचरा प्रक्रियेतून वीज निर्मिती करणारे प्रकल्प उभारले आहेत. यातूनही मोठ्या प्रमाणावर वीज तयार होणार आहे, तिची देखील विक्री केली जाणार आहे. शहरातील रस्त्यावर लावण्यात आलेल्या विद्युत खांबांसाठी लागणाऱ्या विजेत बचत करण्यासाठी एलईडी दिवे लावण्यात येत आहेत. महापालिका वीज बचत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिकेच्या वीज देयकावर होणारा भार कमी होणार असून मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार आहे.

- दीपक खांबीत, अभियंता भाईंदर शहर

logo
marathi.freepressjournal.in