बदलापूर: विजेच्या लपंडावाने हैराण झालेले बदलापूरकर लवकरच लोडशेडिंगला 'टाटा' करणार आहेत. बदलापुरात महावितरणला सुरळीत वीजपुरवठा करता यावा, यासाठी टाटा कंपनीकडून ४०० मेगावॅट वीज उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात बदलापूरकरांची विजेच्या लपंडावातून सुटका होण्याची चिन्हे आहेत.
झपाट्याने विस्तारणाऱ्या बदलापूर शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच विजेची मागणीही वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठ्यात अडचणी येऊन विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांनी महावितरणला टाटा कंपनीकडून वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आमदार किसन कथोरे यांनी सोमवारी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे तसेच टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह बदलापूर पूर्वेकडील मोहपाडा येथे टाटा कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पांतर्गत टाटा कंपनीच्या वीज वाहिन्या बदलापुरातून गेल्या आहेत; त्या वाहिन्यांमार्फत बदलापूर शहरासाठी सुरुवातीला १०० केव्ही व नंतर ४०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. मात्र हा वीजपुरवठा थेट ग्राहकांना करण्यात येणार नसून महावितरणला केला जाणार आहे. बदलापुरातील वीज ग्राहकांना महावितरणमार्फतच हा वीजपुरवठा केला जाणार असून वीज ग्राहकांना विजेची बिलेही महावितरणकडून दिली जाणार आहेत. टाटाकडून मिळणाऱ्या या अतिरिक्त विजेमुळे विजेच्या वाढत्या मागणीचा महावितरणवर वाढत असलेला ताण कमी होऊन त्यांना नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.
टाटा कंपनी आणि महावितरण यांच्या सहकार्याने बदलापुरात चार एकर जागेवर प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यातून बदलापूर शहरासाठी ४०० मेगावॅट उपलब्ध होईल. आगामी काळात बदलापूरकरांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होईल.
-किसन कथोरे (आमदार, मुरबाड विधानसभा)
प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य करणार
महावितरणने सहमती दर्शवली असल्याने टाटा कंपनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे बदलापुरात प्रकल्प उभारणीसाठी प्रस्ताव सादर करणार आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळताच १८ महिन्यांत बदलापूरात प्रकल्प उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला बदलापुरातून जात असलेल्या टाटा कंपनीच्या वाहिन्यांतून १०० केव्ही वीज उपलब्ध करून दिली जाईल. लवकरच टाटाची ४०० केव्हीची वाहिनीही बदलापूरातून जाणार आहे. त्यावेळी बदलापुरातील ४०० मेगावॅट विजेची मागणीही पूर्ण होणार असल्याचे टाटा कंपनीचे अधिकारी किरण देसले यांनी स्पष्ट केले, तर नगर परिषद या प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य करणार असल्याचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले.