लवकरच ठाण्याला स्वतंत्र धरण मिळणार; वाहतूककोंडीतूनही सुटका होणार - मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
ठाणे : ठाण्यातील अंतर्गत मेट्रोला चालना, गायमुख ते फाऊंटन टनेल, गायमुख बायपास, गायमुख चौपाटी अशा अनेक प्रकल्पांवर काम सुरू असून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून हरित ठाण्यावर भर तसेच वाहतूककोंडी मुक्त ठाणे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर लवकरच ठाण्याला स्वतंत्र धरण मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध वास्तूंचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी सरनाईक यांच्या कामांचे कौतुक करताना ठाण्यात उभारण्यात आलेल्या या वास्तू सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात हा क्षण नोंद करण्यासारखा आहे. १२ समाजासाठी १२ मजली समाज भवन भवन बांधण्यात आले आहे. क्लस्टरमध्ये प्रत्येकाला ३ हजार चौरस मीटर देण्याचे नियोजन होते, ठाण्याला इतिहास आहे, परंपरा आहे. आनंद दिघे यांच्याकडे सर्व समाजाचे लोक जायचे तीच परंपरा आम्ही पुढे नेत असल्याचे उद्गार समाज भवनचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी काढले.
घोडबंदरची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी गायमुख बायपासचे काम सुरू करत आहे. बोरिवली टिकुजिनीवाडीपासून सरळ मुंबईला जाता येणार आहे. गायमुख ते फाऊंटन टनेल सुद्धा होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मला मुख्यमंत्री केल्याने माझी जबाबदारी वाढल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ठाण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरण प्रस्तावित करण्यात आले असून याचे काम देखील सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. लवकरच ठाण्याला स्वतंत्र धरण मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
या वास्तूंचे झाले लोकार्पण..
- ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक स्व. बाबुराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर,
- डॉ. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्र, लोकार्पण
- हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी, टप्पा क्र. २., गायमुखचे लोकार्पण
- विविध समाज भवनाच्या प्रस्तावित इमारत, कासार वडवली भूमिपूजन सोहळा
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे, हरित ठाणे याच्या अंतर्गत १ लाख झाडे लावण्यात आली असून गायमुखला अर्बन फॉरेस्ट बनवले आहे. ठाण्यात हिरवळ, डोंगरामुळे ३ टक्के तापमान कमी आहे त्याचबरोबर मुबलक पाणी आहे. मुंबईत डीप क्लीन मोहीम राबविणारा मी पहिला मुख्यमंत्री असून त्यामुळे प्रदूषण कमी झाले. चौपाटीमध्ये बांबूची झाडे लावा अशा सूचना आयुक्तांना आपण दिल्या आहेत, बांबूपासून अनेक उत्पादने आपण तयार करत आहोत, सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा बांबू हा एकमेव वृक्ष असून १० हेक्टर बांबूची लागवड करणार आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री