मोखाडा तालुक्यात मान्सूनपूर्व कामांना वेग

घराच्या डागडुजीसाठी प्लास्टिक ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामाची घाई
मोखाडा तालुक्यात मान्सूनपूर्व कामांना वेग

दीपक गायकवाड

मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आल्याने शहरासह ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांची गती वाढली असून, सर्वत्र लगबग दिसून येत आहे. घराच्या डागडुजीसाठी प्लास्टिक ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामाची घाई बळीराजा करत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी मातीची घरे छतावर तसेच जनावरांचा चारा खराब होऊ नये म्हणून आच्छादनासाठी विविध प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करतात. ८ जून रोजी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातच अवकाळी वादळ आणि जोरदार झालेल्या पावसाने बऱ्याच ठिकाणी कमालीची नासधूस केली आहे. त्यामुळे घरांवर आच्छादन टाकण्यासाठी बाजारात प्लास्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

पाऊस येण्यापूर्वी घरांची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे. डागडुजीच्या कामांना विलंब न करणे सोईस्कर असल्याने वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य करत आहेत. तसेच पावसाळ्यात जनावरांचा चारा भिजू नये म्हणून जनावरांच्या गोठ्याची व्यवस्था ताडपत्रीच्या साहाय्याने शाकारणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.

जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम नागरिकांनी हाती घेतले असून छतावरील गळत असलेल्या ठिकाणांवर प्लास्टिकचे आच्छादन ठेवण्याचे जोरदार काम चालू आहे. पावसाळ्यात कांदा, मिरची साठवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लगबग दिसून येते.

कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर

ग्रामीण भागात पूर्वी गवत आणि कौलारू घरे मोठ्या प्रमाणात असायची. पावसाळापूर्वी या घरांची डागडुजी करून कौलारू घरांची फेरणी केली जात होती. परंतु, ग्रामीण काही भागात स्टीलचे पत्रे, सिमेंट पत्र्यांचा सर्रासपणे वापर केला जातो त्यामुळे आता कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in