स्मार्ट ग्रंथालयातून वाचन संस्कृतीचा प्रसार; १८ स्मार्ट ग्रंथालयांच्या उभारणीचे काम पूर्ण

ठाणे जिल्हा परिषद आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २८ स्मार्ट ग्रंथालये उभारण्यात येत असून, यापैकी १८ ग्रंथालयांचे काम पूर्ण झाले आहे.
smart library
Freepik
Published on

ठाणे : शहरी-ग्रामीण भेद दूर करत ग्रामीण नागरिकांचे सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांना डिजिटल साक्षरतेच्या जगात प्रवेश देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २८ स्मार्ट ग्रंथालये उभारण्यात येत असून, यापैकी १८ ग्रंथालयांचे काम पूर्ण झाले आहे. विविध विषयांची तब्बल २ हजारहून अधिक पुस्तके, ऑडिओ बुक्स, स्मार्ट टीव्ही आणि वाय-फाय यांसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे ग्रंथालय आहे.

'वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार' ही मोहीम सर्वच क्षेत्रात जोर धरत आहे. लहानगे, तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्वानाच वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यातून समाज प्रबोधन व्हावे या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या संकल्पनेतून नागरी सुविधेच्या २८ ग्रामपंचायतींमध्ये ई -स्मार्ट ग्रंथालय तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी ५ लाखाचे अनुदान देण्यात आले असून, आतापर्यंत १८ स्मार्ट ग्रंथालयांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच उर्वरित ग्रंथालयांचे देखील काम पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

तालुकानिहाय स्मार्ट ग्रंथालये

  • भिवंडी २०

  • शहापूर ०३

  • कल्याण ०३

  • अंबरनाथ ०२

  • एकूण २८

आधुनिक शैक्षणिक सुविधा

या ग्रंथालयात सर्व गटातील वाचकांना विनामूल्य प्रवेश असून, लहान मुलांसाठी कॉमिक्स, बोधकथापर पुस्तके, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरित्र ग्रंथ, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तके, तसेच इतर विविध विषयातील दोन हजारहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. तसेच एक हजारहून अधिक ई- पुस्तके आणि ऑडिओ बूक्सचाही समावेश आहे. ग्रंथालयात स्मार्ट टीव्ही आणि वाय-फाय यांसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधादेखील पुरविण्यात आल्या आहेत. येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रंथालयाचे पर्यवेक्षण करण्यासाठी आणि वाचकांना मार्गदर्शन करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण दिले गेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in