उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज; ठाणे विभागात ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन

उन्हाळी सुट्टीसाठी एसटीचा ठाणे विभाग सज्ज झाला असून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे विभागातील आठ आगारांतून नियमित आणि अतिरिक्त अशा एकूण ४९९ बसफेऱ्या विविध मार्गांवर धावणार आहेत.
उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज
उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्जसंग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : उन्हाळी सुट्टीसाठी एसटीचा ठाणे विभाग सज्ज झाला असून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे विभागातील आठ आगारांतून नियमित आणि अतिरिक्त अशा एकूण ४९९ बसफेऱ्या विविध मार्गांवर धावणार आहेत.

एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी हंगामासाठी ५७ अतिरिक्त बसफेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नियमित २८६ फेऱ्याही सुरू राहणार आहेत. या सर्व फेऱ्या मिळून एकूण ४९९ बसफेऱ्या कोकण, खान्देश, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांकडे धावणार आहेत. दरम्यान, एसटी प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन केले असून गर्दीच्या काळात अतिरिक्त बसफेऱ्यांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाढती गर्दी लक्षात घेऊन नियोजन

कोल्हापूर, चिपळूण, सातारा, धुळे, संभाजीनगर, जळगाव, शिर्डी, अहिल्यानगर, दापोली, रत्नागिरी, साक्री, वडुज इत्यादी प्रमुख मार्गांवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीने विशेष नियोजन केले आहे. ठाणे एक, ठाणे दोन, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, वाडा आदी आठ आगारांतून या बससेवा सुरू राहणार आहेत.

शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीमुळे मागणी वाढली

उन्हाळी सुट्टीत शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक गावाकडे रवाना होतात. तसेच ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम असल्यानेही एसटी बसची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बससेवांवर विशेष भर देण्यात आला आहे.

भाडेवाढीमुळे खिशावर परिणाम

एसटीच्या साध्या (लाल परी) बसच्या भाड्यात नुकतीच १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रति टप्पा भाडे १० रुपयांवरून ११ रुपये झाले असून याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. एकीकडे गावी जाण्याची ओढ, तर दुसरीकडे भाडेवाढ, अशा दुहेरी कात्रीत प्रवासी सापडले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in