मीरा-भाईंदरमध्ये स्टॉल परवाना धोरण निश्चित

मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने दिव्यांग, दूध विक्री व गटई कामगारांना नवीन स्टॉल परवाना देणे बंद केले होते
मीरा-भाईंदरमध्ये स्टॉल परवाना धोरण निश्चित

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून स्टॉल लावण्यासाठी परवाना देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे अनेकांनी स्टॉल परवाना देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने स्टॉल लावण्यासाठी दिव्यांग, दूध विक्री केंद्र तसेच गटई कामगारांच्या स्टॉलचे धोरण निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात दिव्यांगांना स्टॉल देण्यासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.

मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने दिव्यांग, दूध विक्री व गटई कामगारांना नवीन स्टॉल परवाना देणे बंद केले होते. त्यानंतर स्टॉलला परवानगी मिळावी यासाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे. दिव्यांग व गटई कामगार यांनी अनेक वेळा महापालिका मुख्यालयावर मोर्चे काढली, आंदोलने केली. त्यानंतर देखील महापालिका परवानगी देत नसल्यामुळे अनेकांनी बोगस परवानगी तयार करून अनधिकृत स्टॉल लावले. अनेकांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमत करून स्टॉल स्थलांतर करण्याच्या नावाखाली अनधिकृत स्टॉल लावले आहेत. अनेक स्टॉल धारक हे या स्टॉलमध्ये गुटखा, तंबाखू व अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे देखील सांगितले जाते.

हे स्टॉल लावून दुसऱ्याला भाड्याने दिले आहेत. याप्रकरणी आयुक्तांकडे अनेक तक्रारी आल्यानंतर आयुक्त संजय काटकर यांनी शहरातील स्टॉलचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात दोनशे पेक्षा जास्त स्टॉल अनधिकृत असल्याचे आढळून आले. त्यानंतर महापालिकेने स्टॉलवर कारवाई करण्यास सुरू केली परंतु कारवाईला अनेकांनी विरोध केला त्यामुळे कारवाई पुन्हा थंडावली. स्टॉलला परवानगी देण्यासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. शेकडो अर्ज महापालिका दप्तरी पडून आहेत. महापालिकेकडून परवानगी मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्तांनी स्टॉलला परवानगी देण्याचे धोरण निश्चित करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिकेने स्टॉलला परवानगी देण्यासाठी धोरण निश्चित केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in