भाईंदर ते वसई रो-रो सेवा सुरू करा, खासदार राजन विचारे यांची मागणी

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी भाईंदर ते वसई रो- रो सेवा, जलवाहतूक सेवा सुरू करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.
भाईंदर ते वसई रो-रो सेवा सुरू करा, खासदार राजन विचारे यांची मागणी

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी भाईंदर ते वसई रो- रो सेवा, जलवाहतूक सेवा सुरू करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत २०२६ ला रो-रो सेवेसाठी मंजुरी मिळाली. परंतु पर्यावरणाच्या व पुरातत्त्व विभागाच्या परवानग्या न मिळाल्याने या काम करण्यास विलंब लागत होता. खासदार राजन विचारे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर केल्या. सर्वप्रथम भाईंदर पश्चिमेकडील जेट्टीचे काम पूर्ण झाले त्यानंतर रखडलेल्या वसई जेट्टीचेही काम पूर्ण करून घेतले. या दोन्ही जेट्टीची कामे पूर्ण झाल्याची पाहणी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर केली.

त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी तात्काळ महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांना पत्राद्वारे मीरा-भाईंदर वासीयांना भाईंदर ते वसई या तयार झालेल्या जेट्टीवरून तात्काळ रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी वाहनांची अधिक क्षमता असणारी बोट उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून नागरिकांना दीड तासाचा वाहतूककोंडीचा प्रवास करावा लागत होता, तो या रो -रो जलमार्गे केल्याने दहा मिनिटांचा होणार आहे. हा सुखकर मार्ग लवकर सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच भाईंदर उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांना वसई येथे जाण्यासाठी लांब पल्ल्याचा मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यासाठी त्यांचा वेळ व पैसा दोन्ही खर्चिक पडत आहे. ठाणे जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यालय सुद्धा पालघरला असल्याने बोटीचे लायसन्स व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार त्यांना वसई, पालघरला जावे लागते. त्यामुळे डोंगरी चौक ते वसई जेट्टीवर रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी खासदार विचारे यांनी केली आहे

logo
marathi.freepressjournal.in