भाईंंदर-वसई रो-रो सेवा सुरू करा: राजन विचारे

सर्वप्रथम भाईंदर पश्चिमेकडील जेट्टीचे काम पूर्ण करून घेतले व त्यानंतर रखडलेल्या वसई जेट्टीचेही काम पूर्ण करून घेतले.
भाईंंदर-वसई रो-रो सेवा सुरू करा: राजन विचारे

भाईंंदर : खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई जलवाहतूक सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली होती. सन २०१६ ला केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत मंजुरी मिळाली. परंतु पर्यावरणाच्या व पुरातत्त्व विभागाच्या परवानग्या न मिळाल्याने या कामास सुरुवात करण्यास विलंब लागत होता. खासदार राजन विचारे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर केल्या.

सर्वप्रथम भाईंदर पश्चिमेकडील जेट्टीचे काम पूर्ण करून घेतले व त्यानंतर रखडलेल्या वसई जेट्टीचेही काम पूर्ण करून घेतले. या दोन्ही जेट्टीची कामे पूर्ण झाल्याची खात्री करून घेण्यासाठी शनिवार, दि.०३ फेब्रुवारी २०२४ रोजी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर व वसई या दोन्ही जेट्टीची पाहणी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत केली. त्यावेळी असे निदर्शनास आले की, या दोन्ही जेट्टींची कामे पूर्ण झाली आहेत.

खासदार राजन विचारे यांनी तात्काळ महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांना पत्राद्वारे मीरा-भाईंदरवासीयांना भाईंदर ते वसई या तयार झालेल्या जेट्टीवरून तात्काळ रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी वाहनांची अधिक क्षमता असणारी बोट उपलब्ध करून घ्यावी. जेणेकरून नागरिकांना दीड तासाचा वाहतूक कोंडीचा प्रवास करावा लागत होता तो या रो -रो जलमार्गे केल्याने दहा मिनिटांचा होणार आहे. हा सुखकर मार्ग लवकर सुरू करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

पर्यटकांनाही चालना मिळणार

भाईंदर येथील जैयसल पार्क जेट्टीवरून घोडबंदर मार्गावरील फाऊंटन हॉटेलजवळील तयार झालेल्या जेट्टीचा वापर प्रवासी बोट सुरू करून जलवाहतुकीसाठी करावा. जेणेकरून पर्यटकांनाही चालना मिळेल. तसेच ६ महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतील पहिल्या टप्प्यात डोंबिवली, कोलशेत, मीरा-भाईंदर, काल्हेर या जेटींची कामे सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in