उरणवरून थेट सीएसएमटी लोकल सुरू करा- महेश बालदी

उरणकरांना थेट मुंबई गाठता येत नसल्याने उरणवरून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनल्स अशी लोकल सुरू करावी, अशी मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
उरणवरून थेट सीएसएमटी लोकल सुरू करा- महेश बालदी

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १२ जानेवारी रोजी उरण- खारकोपर या दुसऱ्या टप्यातील रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे खऱ्या अर्थाने उरणकरांचे मागील ५० वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आहे. उरणकरांना वाहतूककोंडीच्या कटकटीशिवाय आत्ता ४० मिनिटांत नेरूळ, बेलापुर गाठता येते; मात्र या रेल्वेने उरणकरांना थेट मुंबई गाठता येत नसल्याने उरणवरून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनल्स अशी लोकल सुरू करावी, अशी मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

उरण स्टेशनवरून सकाळी ६ वा.५ मिनिटांनी पहिली लोकल सुटते. सिडको, मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ-उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ, सीवूड, सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी, उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्ग आता प्रवासी वाहतूकीसाठी शुक्रवारपासून खुला झाला आहे. उरणकरांना आता १५ रुपयांत ४० मिनिटांत बेलापूरला पोहचणे शक्य होणार आहे. तसेच उरणहून मुंबई -सीएसटीला दीड तासात सहज पोहचता येणार आहे. यामुळे मोरा-भाऊचा धक्का आणि नव्याने सुरू झालेल्या शिवडी-न्हावा सेतूपेक्षाही कमी खर्चात मुंबईत जाता येणार आहे.

उरण-खारकोपर रेल्वेचे प्रवाशांनी स्वागत केले असून, या रेल्वेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. उरणवरून थेट सीएसएमटी लोकल सुरू झाल्यास उरणकरांना नेरूळ किंवा बेलापुर येथून लोकल गाडी बदलण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे सीएसएमटीपर्यंत लोकलची मागणी उरणकरांकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in