भाईंंदर : किमान वेतन कायद्यानुसार मजूर, सफाई कामगार कुशल व अकुशल कामगारांना किमान वेतन ठरविण्यात आलेले आहे. पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार, मजुरापासून अगदी फेरीवाला आणि रिक्षावाला यांच्या रोजच्या कमाईपेक्षा भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटी कमर्चाऱ्यांचे वेतन खूप कमी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणे सोडाच उलट त्यात आणखी कपात झाली असून तुटपुंज्या पगारात घर चालवायचे तरी कसे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयातच शवागार व शवविच्छेदन केंद्र आहे. याठिकाणी शवविच्छेदनासाठी येणाऱ्या शवांची चिरफाड करण्याकरिता ३ कटर, ३ सफाई कर्मचारी व २ लिपिक असे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. आधी शासनाने सादर कंत्राट हे फोकस फॅसिलिटी या ठेकेदारास दिले होते. आता शासनाने फोकससह सक्षम फॅसिलिटी, डी. एम. एंटरप्रायझेस असे तीन ठेकेदार नेमले आहेत. फोकस फॅसिलिटीने कंत्राटी कमर्चाऱ्यांचा मार्चचा पगार अजून दिलेला नाही. तर काही महिन्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम सुद्धा भरली नसल्याचे कामगार संघटना पदाधिकारी यांचे म्हणणे आहे. त्यातच नव्याने ठेके दिले गेल्यानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीसह नव्याने बोनस व कर याची कपात केली जाणार आहे . त्यामुळे ज्या कटर, सफाई कामगार यांना १० हजार ७०० रुपये महिना पगार मिळायचा तो आता ९ हजार ८०० रुपये मिळणार आहे.
ज्या लिपिकांना ११ हजार ७०० रुपये महिना पगार मिळायचा तो आता १० हजार ६०० रुपये इतका मिळणार आहे. पगार आणखी कमी होणार म्हणून एका कंत्राटी कटरने कामावर येणे बंद केल्याने शवविच्छेदनावेळी इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडला आहे.