भिवंडीमधील रामेश्वर मंदिरावर दगडफेक

भिवंडी शहरातील आग्रारोड काप-कणेरी येथे पुरातन शंकर भगवंताचे रामेश्वर मंदिर आहे.
भिवंडीमधील रामेश्वर मंदिरावर दगडफेक

भिवंडी : येथील रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहावर गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या अंधारात दगडफेक केली जात आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरातील आग्रारोड काप-कणेरी येथे पुरातन शंकर भगवंताचे रामेश्वर मंदिर आहे. शेकडो वर्षे हे पुरातन मंदिर आणि त्याच्या शेजारी मंदिराचे मोठे तळे शहराबाहेर असल्याने त्याच्या सभोवताली फारशी लोकवस्ती नव्हती. मंदिरात पहाटेपासून भक्तगणांची रेलचेल असते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; मात्र गेल्या तीस वर्षांत या मंदिराच्या सभोवताली गैर हिंदूंची लोकवस्ती वाढली. त्यामधून या मंदिराच्या वहिवाटीवर शिवभक्तांना अनेक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने २ मार्च ते ८ मार्च २०२४ पर्यंत हरिनाम सप्ताह निमित्ताने धार्मिक कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे शेकडो नागरिक महिला वर्ग सहभागी होत आहेत.

शनिवारी आणि रविवारी रात्री मंदिरात कीर्तन कार्यक्रम सुरू असताना या देवळामागील चुन्नू शेठ बिल्डिंगच्या रस्त्यावरून एक वीट व दगडाचा तुकडा कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या पल्लवी राम भारती व अन्य एका या महिलेच्या हाताच्या दंडास व पाठीला लागला. त्यांनी ही बाब मंदिराच्या विश्वस्तांना सांगितली. धार्मिक कीर्तनाचे कार्यक्रमात अडथळा निर्माण होऊन तसेच शहराची शांतताभंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक वीट व दगड फेकले आहेत.

शहरातील शांतता कायम रहावी आणि धार्मिक उत्सवाला बाधा येऊ नये. तसेच दगडफेक करणाऱ्या इसमावर कारवाई व्हावी म्हणून रामेश्वर मंदिरामागे सीसीटीव्ही लावले आहेत. तसेच लाइटचा फोकस लावला असून, मंदिरामागे गस्त घालण्यासाठी दोन पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे.

- महादेव कुंभार, शहर पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

logo
marathi.freepressjournal.in