कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; १० महिन्यांत १८ हजार नागरिकांना चावा

कल्याण-डोंबिवली शहरात जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या कालावधीत १८,७०५ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; १० महिन्यांत १८ हजार नागरिकांना चावा
Published on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या कालावधीत १८,७०५ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या आकडेवारीवरून शहरात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

काही दिवसांपूर्वी टिटवाळा येथे एका महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. कल्याण बेतूरकर पाडा परीसरात भटक्या कुत्र्याने आठ वर्षांच्या मुलाला चावा घेतल्याची घटना घडली होती. अशा अनेक घटना घडल्याने कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आकडेवारीनुसार शहरात दर महिना कुत्रे चावण्याच्या दोन हजार घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. रात्री-अपरात्री कामावरून परतणाऱ्या, तर कधी घराबाहेर खेळणाऱ्या मुलांना भटके कुत्रे लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

१२,४०६ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण

केडीएमसीच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत १२,४०६ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण केले आहे. दर महिना सरासरी हजार ते बाराशे भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. कुत्रा चावल्यानंतर तत्काळ उपचार घ्यावेत. त्यावर औषधे, इंजेक्शन केडीएमसी रुग्णालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in