विजय मांडे/ कर्जत
थंड हवेच्या प्रदेशात ऑर्किड या महागड्या फुलांना बहर येत असतो. मात्र कर्जतसारख्या काहीशा उष्ण तापमानाच्या प्रदेशात पॉली हाऊसमध्ये ऑर्किड फुलांची शेती करण्यात यश संपादन केले आहे. आपली आवड जपण्यासाठी शिक्षिकेची नोकरी सोडली आणि शेतीमध्ये आपले पाय घट्ट रोवले. कर्जतमधून आठवड्याला ऑर्किडची फुले दादर येथील फूल बाजारात जाऊ लागली आहेत. त्यामुळे कर्जतमध्ये ऑर्किड देखील फुलते हे सिद्ध झाले आहे.
अनेक दिवस टिकणारे फूल म्हणून ऑर्किडच्या फुलांची ओळख आहे. सतत ताजेतवाने दिसणारे हे फूल उत्सव काळात शेतकऱ्यांना मालामाल करून देणारे उत्पादन म्हणून त्याकडे पाहिले जाते. प्रामुख्याने थंड हवेत होणारे हे ऑर्किड फुलांचा हंगाम जून ते जानेवारी या कालावधीत सर्वाधिक असतो. अख्ख्या नारळाच्या लोंब्यात वाढणारा ऑर्किड फुलांचा कंद असून कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये लागवड केलेली नसताना देखील ऑर्किडची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात बहरलेली दिसते. गणेशोत्सव काळात ऑर्किड फुलांच्या एका काठीला चाळीस ते पन्नास रुपयांचा भाव मिळतो. त्यामुळे या शेतीबद्दल उत्सुकता म्हणून कोविड काळात जग शांत झालेले असताना मुंबई येथील एका शाळेतील शिक्षिका निरुपमा मोहन यांनी कर्जत येथे शेती करण्यासाठी जमीन घेतली. त्या जमिनीत फुलांची किंवा भाजीपाला शेती करावी म्हणून त्यांनी तळेगाव येथील हॉर्टिकल्चर महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले आणि कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली येथे जाऊन ऑर्किड शेतीचे महत्त्व समजून घेतले.
फुलांची आवड असलेल्या निरुपमा मोहन यांनी कर्जत येथे कृषी अधिकारी यांचा सल्ला घेतला आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानमधून हरित गृह बांधण्यासाठी अनुदान मिळावे म्हणून शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरून प्रतीक्षा केली. जानेवारी २०२३ मध्ये वेणगाव येथील जमिनीमध्ये २० गुंठे क्षेत्रात पॉलीहाऊस उभारून घेतले. ऑर्किड फुलांची शेती करण्यासाठी अनेकांच्या सल्लानंतर पुणे येथील राईज एन शाईन या कंपनीबरोबर करार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्किड फुलांचे कंद आणून त्यांची लागवड सुरू केली.
चार महिन्यांनी म्हणजे जून महिन्यात ऑर्किडची तब्बल १९ हजार कंदांची लागवड नारळाच्या लोंब्यात करण्यात आली. सुधारित प्रकारे मातीमध्ये लागवड न करता ते कंद जमिनीच्यावर तीन फूटवर जीआय पाइप यांच्या सहाय्याने उभारलेल्या बेडवर करण्यात आली. त्याच्या बाजूने खते आणि कीटकनाशक यांचा वापर करण्यासाठी ठिबक सिंचन वाहिन्या जोडण्यात आल्या.
कंद लागवड झाल्यावर साधारण सात ते आठ महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होते आणि त्या झाडाची व्यवस्थित काळजी घेतली तर किमान सहा ते सात वर्षे उत्पन्न देवून शकतात. त्या फुलणावर सूर्यप्रकाश जास्त पडू नये यासाठी पॉलीहाऊसचे खाली आच्छादन टाकण्यात आले. पावसाळ्यात कधी तरी सूर्याचे दर्शन होते आणि त्यावेळी ते अच्छादन बाजूला हटवून सूर्यप्रकाश देण्याची व्यवस्था तेथे केली आहे. पॉलीहाऊसमध्ये असलेल्या ऑर्किड फुलांच्या झाडांना चांगला प्रकाश मिळावा म्हणून जमिनी लगत असलेले आच्छादन उघडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑर्किड फुलांच्या कंद यांना दररोज किमान एकवेळ आणि उन्हाळा हंगामात तीन ते चार वेळा पाणी द्यावे लागते. त्यामुळे महिला शेतकरी निरुपमा मोहन यांनी आपल्या राजनाला कालवा परिसरातील शेतीमध्ये बोअरवेल खोदून घेतल्या आहेत.
आम्ही ही शेती करू लागल्यावर मुंबईमधील बाजारात फुलांची विक्री कशी होते हे पाहून घेतले आहे. आम्ही फुलांचे गुच्छ देखील बनवून घेतो आणि मोठ्या प्रमाणात दादर फुलबाजारात मालाची विक्री करतो. आमची https://www.purplensnow.com ही वेबसाइट असून त्यावर ऑर्डर घेतो आणि त्यानुसार विक्री व्यवहार सुरू आहे. सध्याच्या उन्हाळ्यात आम्ही झाडांची वाढ होण्यासाठी उत्पादन कमी मिळाले तरी चालेल, पण झाडे आणखी मजबूत होण्यासाठी लक्ष देऊन आहोत. सर्व कृषी अधिकारी यांचे योगदान या शेतीसाठी महत्त्वाचे असून सतत मार्गदर्शन केले जात असून त्यांच्यामुळे प्रकल्प यशस्वी होत आहे.
- निरुपमा मोहन, प्रगतशील महिला शेतकरी
सव्वाआठ लाखांच्या अनुदानातून पॉलीहाऊस
महिला शेतकरी निरुपमा मोहन यांच्या शेतातून जानेवारी महिन्यापासून ऑर्किड फुले मुंबईमधील फूल बाजारात विक्रीसाठी नेली जात आहेत. लग्नसमारंभ आणि उत्सव यांच्या काळात या फुलांना मोठी मागणी असते. सध्या आठवड्यातून एकदा फुलांचे ताटवे प्लास्टिकमध्ये पॅक करून मुंबईमध्ये नेण्यात येत आहेत. कर्जतसारख्या काहीशा उष्ण हवामानाच्या प्रदेशात पॉलीहाऊसमध्ये ऑर्किडची शेतीचा यशस्वी प्रयोग झाला आहे. त्यावेळी महिला शेतकरी निरुपमा मोहन यांना कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कुमार कोळी आणि अन्य कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक यांच्या आठवड्यातून दोनदा भेटी असतात. या प्रकल्पासाठी शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामधून सव्वाआठ लाखांचे अनुदान पॉलीहाऊस बांधण्यासाठी देण्यात आले आहे.