ठाणे : ठाणे शहर हे खाडीकिनारी असल्याने मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेत वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून चक्कर येऊन पडणे, स्नायूंना पेटके यणे, डोकेदुखी, श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, झटके येणे याची माहिती द्यावी, नजीकचे आरोग्य केंद्र/ रुग्णालयात त्याबाबत नोंद करणे तसेच उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेताना काय करावे व काय करू नये व उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत आशा वर्कर यांना प्रशिक्षण देवून याबाबतची जनजागृती नागरिकांमध्ये करण्याचे निर्देश देत असतानाच नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.
ठाणे शहराचा उष्णता उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यासाठी गठित केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक नुकतीच महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संनियंत्रणाखाली झाली. गेल्या काही वर्षामध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता व वारंवारीता वाढत असून रात्रीचे तापमान देखील वाढत आहे. त्याची झळ दैनंदिन कामकाज करताना समाजाच्या सर्व स्तरावर जाणवत आहे. वागळे इस्टेट प्रभागामध्ये अंदाजे ४० टक्के लोकसंख्या ही १५ लाटेचा परिणाम जास्त तीव्रतेने जाणवत आहे. परिसरात ठिकठिकाणी पाणपोईची संख्या वाढविणे, सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे जसे बस स्टॅण्ड, रिक्षा स्टॅण्ड या ठिकाणी सावली वाढविणे अशा उपाययोजना नागरिकांनी सुचविल्या असल्याचे नमूद करण्यात आले.
दर १५ दिवसांनी कामांचा आढावा
उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत रहिवासी संकुलांमध्ये माहिती पत्रके वाटणे, डिजिटल बोर्डवर सूचना प्रसिद्ध करणे, शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांना वेळोवळी पाणी पिण्यासाठी सूचना देणे यासारख्या बाबी समाविष्ट करणे तसेच आशा वर्कर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबतचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी सदर बैठकीत संबंधितांना दिले. तसेच दर १५ दिवसांनी टास्क फोर्सची बैठक घेऊन केलेल्या कामाचा आढावा घेण्याबाबतच्या सूचनाही यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.