मीरा -भाईंदरमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम ९० टक्के पूर्ण; फेब्रुवारी महिन्यात होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - आमदार प्रताप सरनाईक

सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी जिथे मोफत केल्या जातील असे मीरा -भाईंदर मधील १०० बेडचे सुपर स्पेशालिटी ‘मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालयाचे’ काम अंतिम टप्प्यात आले आहे
मीरा -भाईंदरमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम ९० टक्के पूर्ण; फेब्रुवारी महिन्यात होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - आमदार प्रताप सरनाईक

भाईंदर : सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी जिथे मोफत केल्या जातील असे मीरा -भाईंदर मधील १०० बेडचे सुपर स्पेशालिटी ‘मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालयाचे’ काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या हॉस्पिटल इमारतीचे थोडे सिविल वर्क फिनिशिंग होत असून, फर्निचर बसविणे, मनुष्यबळ नियुक्ती ही कामे पूर्ण होत आली आहेत. सगळी कामे पूर्ण करूनच हॉस्पिटलचे लोकार्पण करायचे ठरविण्यात आले आहे. बुधवारी आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त संजय काटकर यांनी हॉस्पिटलच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. सगळी कामे पूर्ण करून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या कॅशलेस हॉस्पिटलचे लोकार्पण केले जाईल, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाजवळ ही हॉस्पिटल इमारत कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या मोबदल्यात बांधून महापालिकेला मिळाली आहे. या चार मजली इमारतीत हे कॅशलेस हॉस्पिटल मिरा भाईंदरकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवले. या हॉस्पिटल इमारतीचे नामकरण ‘मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालय' असे करण्यात आले आहे. या हॉस्पिटल इमारतीत सर्व आधुनिक मशिनरी व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार सरनाईक यांनी २५ कोटी विशेष निधी मंजूर करून आणला. यात महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही.

चार मजली हॉस्पिटल इमारत हायवे जवळ उभी राहिली असून, त्यात सर्व सुपर स्पेशिलीटी उपचार मिळणार आहेत. मीरा-भाईंदर शहरातील हे पहिले सरकारी कॅशलेस हॉस्पिटल असणार आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन २३ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. पण हॉस्पिटल इमारतीत काही कामे बाकी असून, ती सगळी कामे पूर्ण करूनच लोकार्पण करावे, असे आमदार सरनाईक व आयुक्तांनी ठरवले. त्यानुसार हॉस्पिटलच्या कामाची बुधवारी आमदार प्रताप सरनाईक व मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय श्रीपतराव काटकर यांनी सर्व संबधित अधिकारी वर्गासह पाहणी केली आणि फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या आत काम पूर्ण करून लोकार्पण करण्याचे निश्चित केले. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून, सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. सरकारच्या योजनेतून येथे मोफत उपचार होणार आहेत. लाखो रुपये ज्या ऑपरेशन साठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होणार आहेत. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. येथे डॉक्टर , नर्स व आवश्यक सर्व कर्मचारी वर्ग नियुक्तीची प्रक्रियाही सध्या वेगाने सुरू आहे.

हे 'हॉस्पिटल' माझे स्वप्न- सरनाईक

१०० बेडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कॅथ लॅब, सिटी स्कॅन युनिट, आधुनिक सुसज्ज ऑपरेशन कक्ष, सर्जिकल आयसीयू युनिट असणार आहे. हे कॅशलेस हॉस्पिटल असणार असल्याने पेशंटच्या साध्या तपासणी पासून, विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. हे हॉस्पिटल म्हणजे गरीब - गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे. हॉस्पिटलची कामे अंतिम टप्प्यात असून, सगळी कामे पूर्ण करून फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात हॉस्पिटलचे लोकार्पण होईल, असे आज आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांना सांगितले. असे कॅशलेस हॉस्पिटल माझ्या मतदारसंघात निर्माण व्हावे हे माझे स्वप्न होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हॉस्पिटलसाठी २५ कोटींचा निधी दिला. गरीब, गरजू रुग्णांना संजीवनी देणारे हे हॉस्पिटल मीरा- भाईंदरच्या नागरिकांसाठी सगळ्यात मोठी भेट ठरणार आहे असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in