सुपरमॅक्स कामगार मासिक वेतनापासून वंचित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर ठिय्या, १ हजार ८०० कामगार दोन वर्षांपासून वेतनाविना

सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सुमारे १ हजार ८०० कामगारांना गेली दोन वर्षे कंपनी व्यवस्थापनाने मासिक वेतन दिले नसल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी रविवारी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरच ठिय्या मांडला.
सुपरमॅक्स कामगार मासिक वेतनापासून वंचित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर ठिय्या, १ हजार ८०० कामगार दोन वर्षांपासून वेतनाविना
छाया : दीपक कुरकुंडे
Published on

ठाणे : सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सुमारे १ हजार ८०० कामगारांना गेली दोन वर्षे कंपनी व्यवस्थापनाने मासिक वेतन दिले नसल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी रविवारी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरच ठिय्या मांडला. काही दिवसापूर्वी मध्यस्थी करून तुमचा प्रश्न सोडवतो, असे आश्वासन देणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी या कामगारांना दिले होते. मात्र कामगारांना अद्याप कोणत्याच प्रकारची देणी मिळाली नसल्याने नेमकी कोणती मध्यस्थी केली, असा थेट सवाल कामगारांनी केला.

ठाण्यातील तीनहात नाका परिसरात तब्बल ७० वर्षे जुनी सुपरमॅक्स ही कंपनी आहे. या कंपनीत ब्लेड तयार करण्याचे काम करण्यात येत असून हजारो कामगार या कंपनीमध्ये काम करत होते. दोन वर्षांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवू शकत नसल्याचे कारण पुढे करत कंपनी बंद केली आहे. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून करण्यात आली नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.

कंपनी बंद करत असल्याचे ज्यावेळी सांगण्यात आले त्यावेळी कामगारांचा पगार सुरू राहील, असे आश्वासन कामगारांना देण्यात आले होते. मात्र दोन वर्षांपासून कंपनी व्यवस्थापनाकडून पगारच मिळाला नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात कामगारांच्या वतीने अनेकवेळा आंदोलनेही करण्यात आली आहेत.

कंपनीचा ताबा घेण्यासंदर्भात प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले. या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने संसार कसा चालवायचा? असा प्रश्न कामगारांना भेडसावत आहेत.

एकीकडे राज्यातील उद्योगधंदे बाहेर जात असताना किमान आम्ही जेवढे काम केले आहे, तेवढ्या महिन्याचा पगार मिळावा, अशी मागणी कामगारांनी रविवारी केली. रविवारीही हजारो कामगार त्यांच्या पत्नीसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जमा झाले.

logo
marathi.freepressjournal.in