

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर अवघ्या दोन तासांत गुन्हा दाखल होतो; मात्र माझे बंधू अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाण्यातील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना सुळे यांनी सरकारवर टीका केली. अजित पवार यांच्या मृत्यूनमंतरही त्यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार सत्तेत सहभागी आहेत. मात्र, त्यांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर किंवा चौकशीबाबत त्यापैकी एकही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘माझा भाऊ गेला, पण त्यांच्या पक्षाचे लोक अजूनही सत्ता भोगत आहेत. या प्रकरणाचा तपास नेमका कुठे सुरू आहे, याची आम्हालाच माहिती नाही. पंतप्रधानांचा फोटो काढल्यावरून दोन तासांत गुन्हा दाखल होतो, तर दुसरीकडे माझ्या भावाच्या मृत्यूप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही,’ असे सुळे म्हणाल्या.
मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष
रस्त्यांच्या दुरवस्थेवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रात प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे, हेच कळत नाही. ही परिस्थिती आता नवीन राहिलेली नाही, असा टोला त्यांनी लगावला. मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हजारो कोटींचे प्रकल्प का लादले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.
रिंग मेट्रो नको तर चांगली बससेवा द्या!
ठाणेकरांना रिंग मेट्रो नको असून त्याऐवजी चांगली बससेवा हवी आहे. ‘५०० रुपयांत होणारे काम एक लाख रुपयांना का करायचे?’ असा सवाल करत सरकारला महागडे प्रकल्प आवडतात; मात्र सामान्यांसाठीच्या छोट्या प्रकल्पांना निधी नाही, अशी टीका त्यांनी केली. डेटा सेंटरलाही ठाणेकरांचा विरोध असल्याचे सांगत, लोकांना नको असलेल्या प्रकल्पांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे त्या म्हणाल्या. न्यायालयीन सुनावणीबाबत बोलताना ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला कधी संपणार, याची प्रतीक्षा असल्याचे त्या म्हणाल्या. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आपल्यावर झालेला अन्याय भविष्यात कोणासोबतही होऊ नये, यासाठी न्याय मागत असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.