जखमी महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण; पालक मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली विचारपूस

कल्याणचे शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून मात्र अजूनही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे अशी माहिती पालक मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.
जखमी महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण; पालक मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली विचारपूस

ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले कल्याणचे शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून मात्र अजूनही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे अशी माहिती पालक मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. महेश गायकवाड यांच्याशी प्रत्यक्ष बोलता आले नाही, मात्र त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून आपण माहिती घेतली असल्याचे शंभूराजे देसाई यांनी सांगितले. दुसरीकडे कायदा कायद्याचे काम करेल, पोलीस पोलिसांचे काम करतील, कोणताही मंत्री तपासात हस्तक्षेप करणार नाही, असेही यावेळी शंभूराजे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात गोळीबार झाला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा ठाण्यातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

दरम्यान, रविवारी दुपारी ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी देसाई यांनी महेश गायकवाड यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. त्यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.

कायद्याच्या कामात हस्तक्षेप नाही

मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केवळ महेश गायकवाड यांना पाहिले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला सांगितले की गायकवाड यांना योग्य ते उपचार दिले जात आहे. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशी माहिती देसाई यांनी दिली. तसेच याप्रकरणात कायदा त्यांचे काम करेल पोलीस त्यांचे काम करतील. पोलीस किंवा कायद्याच्या कामात सरकार अथवा त्यातील कोणताही मंत्री कसलाही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in