नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील शिवाजीनगर येथे मतदान केंद्र परिसरात एका गाडीत अनेक राउटर आणि लॅपटॉप आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र तपासणी केली असता मोबाईलमधील इंटरनेट वेग मोजण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले. मात्र तोपर्यंत मतदान मशीन हॅक प्रकार असल्याची अफवा झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
बुधवारी नवी मुंबईत सर्वत्र विधानसभा मतदान सुरू असताना सकाळी पावणेदहाच्या सुमारास तुर्भे पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी नगर भागात एक कार आढळून आली, त्यात अनेक राउटर आणि लॅपटॉप काही लोक वापरत असल्याचे दिसून आले. येथून काही अंतरावरच मतदान केंद्र असल्याने मतदान यंत्र हॅक करत असल्याची अफवा उडाली. मात्र पोलिसांनी तात्काळ सदर गाडी ताब्यात घेत थेट नेरूळ पोलीस ठाण्यात आणली. अधिक चौकशी केली असता महापे येथील मार्कोस टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीची ती गाडी असून सदर कंपनी मोबाईलमधील इंटरनेट वेग किती आहे, याचे परीक्षण करत असल्याची माहिती उपस्थित कंपनी कर्मचाऱ्यांनी दिली.
हे काम त्यांना कॉरकॉम या कंपनीने दिले होते तसेच त्यांच्याकडे चिप तपासणी वर्क ऑर्डर आणि अन्य सर्व परवानगी होत्या, असे आढळून आल्याने त्यांना सोडून देण्यात आले. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.