भिवंडी : पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस अंमलदार अशा तिघांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
अनिकेत जाधव (२४) असे या मुलाचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील अनिकेतचे वाशिंद येथील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. लग्न करण्याच्या उद्देशाने ते पळून गेले. मात्र मुलीचे अपहरण अनिकेत याने केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने दोघांचा शोध सुरू केला. ते मध्यप्रदेशात असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळाली. आरोपी तरुणाला मुंबईत घेऊन येत असताना प्रवासादरम्यान त्याने ट्रेनच्या बोगीमधील टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबाच्या तक्रारीनंतर ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी अनिकेतला मध्यप्रदेश मधून ताब्यात घेणारे वाशिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वांगड, पोलीस अंमलदार जोगदंड आणि चलवादी या तिघांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली.